Languages

   Download App

श्री गुरुपौर्णिमा उत्सवास उत्साही वातावरणात सुरुवात

श्री गुरुपौर्णिमा उत्सवास उत्साही वातावरणात सुरुवात

शिर्डी :-

          श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने आयोजित केलेल्या श्री गुरुपौर्णिमा उत्सवास आज उत्साही वातावरणात सुरुवात झाली. उत्‍सवानिमित्‍त श्री साईबाबा समाधी मंदिर व परिसरात विद्युत रोषणाई व आकर्षक फुलांची सजावट करण्‍यात आली.

          आज उत्सवाच्या प्रथम दिवशी पहाटे ५.०० वाजता श्रींच्या प्रतीमेची व श्री साईसच्चरित या पवित्र ग्रंथाची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीत संस्थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी कान्‍हूराज बगाटे यांनी विणा, उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांनी पोथी तर मुख्‍यलेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे व प्रशासकीय अधिकारी राजेंद्र जगताप यांनी श्रींची प्रतिमा घेवून सहभाग घेतला. यावेळी मंदिर प्रमुख रमेश चौधरी, सरंक्षण अधिकारी आण्‍णासाहेब परदेशी व मंदिर पुजारी  उपस्थित होते. मिरवणूक व्दारकामाई मंदिरात आल्यानंतर तेथे श्री साईसच्चरित या पवित्र ग्रंथाच्या पारायणाच्या शुभारंभ संस्थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी कान्‍हूराज बगाटे यांनी प्रथम अध्याय, उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांनी व्दितीय अध्याय, मुख्‍यलेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे यांनी तृतीय अध्याय, कार्यकारी अभियंता संजय जोरी यांनी चौथा अध्याय व संरक्षण अधिकारी आण्‍णासाहेब परदेशी यांनी पाचवा अध्याय वाचन करुन केला.

          उत्सवाचे निमित्ताने सकाळी ६.०० वाजता संस्थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी कान्‍हूराज बगाटे व त्‍यांची सुविद्य पत्‍नी सौ.संगिता बगाटे यांनी समाधी मंदिरात श्रींची पाद्यपुजा केली. दुपारी १२.३० वाजता माध्यान्ह आरती झाली. सायं. ०४.०० ते ०६.०० यावेळेत मंदिर कर्मचारी संभाजी तुरकणे यांचे कीर्तन झाले. सायं.०७.०० वाजता श्रींची धुपारती व रात्रौ १०.३० वाजता शेजारती करण्‍यात आली. तसेच श्री साईसच्चरित पारायाणासाठी व्दारकामाई मंदीर आतील बाजुने रात्रभर खुले ठेवण्‍यात आले.

          यावर्षी उत्सवाच्या निमित्ताने अमेरिका येथील दानशूर साईभक्त श्रीमती शुभा पाई यांच्या देणगीतून मंदिर व परिसरात फुलांची आकर्षक सजावट व सुनिल बाराहाते, साई समर्थ इलेक्‍ट्रीकल, शिर्डी यांनी मंदिर व परिसरात आकर्षक विद्युत रोषणाई केली.

          उद्या उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी शुक्रवार दिनांक २३ जुलै रोजी सकाळी ०४.३० वाजता श्रींची काकड आरती, ०५.०० वाजता अखंड पारायण पारायण समाप्तीनिमित्‍त श्रींच्या फोटोची व पोथीची मिरवणूक, ०५.२० वाजता श्रींचे मंगलस्नान, सकाळी ०६.०० वाजता श्रींची पाद्यपुजा, दुपारी १२.३० वाजता श्रींची माध्यान्ह आरती व सायंकाळी ०४.०० ते ०६.०० या वेळेत कीर्तन कार्यक्रम होणार असून सायंकाळी ०७.०० वाजता श्रींची धुपारती होईल. रात्रौ १०.३० वाजता श्रींची शेजारती होईल.

Undefined
श्री गुरुपौर्णिमा उत्सवास उत्साही वातावरणात सुरुवात
Thursday, July 22, 2021 - 14:00