Languages

   Download App

पुर्वीप्रमाणे गुरुस्‍थान मंदिरास आरतीप्रसंगी प्रदक्षिणाकरीता खुले

पुर्वीप्रमाणे गुरुस्‍थान मंदिरास आरतीप्रसंगी प्रदक्षिणाकरीता खुले

शिर्डी 

          श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने आज दिनांक १४ नोव्हेंबर २०२२ रोजीच्या माध्यान्ह आरतीपासुन श्री साईबाबांच्या समाधीच्या दर्शनासाठी आलेल्या साईभक्तांकरीता पुर्वीप्रमाणे गुरुस्थान मंदिरास आरतीप्रसंगी प्रदक्षिणाकरीता खुले करण्यात आल्याची माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी दिली.

         श्रीमती बानायत म्हणाल्या, श्री साईबाबांच्या दर्शनासाठी आलेले अनेक साईभक्त श्रींची आरती चालू असताना गुरुस्थान मंदिरास प्रदक्षिणा घालत होते. परंतु गेल्या दोन वर्षापुर्वी म्हणजेच सन २०२० साली संपूर्ण जगभरात व देशभरात कोरोना व्हायरसने थैमान घातला. या कोरोना व्हायरसच्या संकटामुळे भारत सरकार व राज्य शासनाच्या वतीने लॉकडाऊन करण्यात आले. यामध्ये धार्मिक स्थळे, सामाजिक ठिकाणी गर्दी होऊ नये, अथवा करु नये, असे निर्देश देण्यात आलेले होते. त्याच पार्श्वभूमीवर दिनांक १७ मार्च २०२० रोजी पासुन श्री साईबाबा समाधी मंदिर भाविकांना दर्शनाकरीता बंद ठेवण्याचा निर्णय संस्थानच्या वतीने घेतला होता. त्यानंतर सन २०२१ मध्ये कोरोना विषाणुच्या प्रमाणात घट झाल्याने राज्य शासनाच्या वतीने कोरोनाचे नियम शिथिल करण्यात आल्यामुळे दिनांक ०७ ऑक्टोंबर २०२१ पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले होते. तसेच कोरोना विषाणुच्या प्रतिबंधत्माक उपाय म्हणून बंद केलेल्या सोयी-सुविधा संस्थानच्या वतीने टप्या-टप्याने खुली करण्यात येत आहे. 

त्याच अनुषंगाने आज दिनांक १४ नोव्हेंबर २०२२ रोजीच्या माध्यान्ह आरतीपासुन श्री साईबाबांचे गुरुस्थान मंदिर पुर्वीप्रमाणे प्रदक्षिणा करण्यासाठी खुले करण्यात आले असल्याचे सांगुन या सुविधेचा जास्तीस-जास्त भाविकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन ही श्रीमती बानायत यांनी केले.

संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी गुरुस्थान मंदिरास प्रथम परिक्रमा करुन या सुविधेचा शुभारंभ केला. तसेच यावेळी त्यांचे समवेत सुमारे १०० ते १५० साईभक्तांनी श्रींची आरती संपेपर्यंत परिक्रमा केल्या. ही सुविधा सुरु झाल्यामुळे भाविकांनी आनंद व्यक्त करत प्रशासनाचे आभार मानले. याप्रसंगी संस्थानचे प्रशासकीय अधिकारी डॉ.आकाश किसवे, संरक्षण अधिकारी आण्णासाहेब परदेशी, मंदिर विभाग प्रमुख रमेश चौधरी, कर्मचारी व साईभक्त उपस्थीत होते.

Undefined
पुर्वीप्रमाणे गुरुस्‍थान मंदिरास आरतीप्रसंगी प्रदक्षिणाकरीता खुले
Tuesday, November 15, 2022 - 10:30