शिर्डी -
श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डी चे वतीन नवीन श्रीसाई मंदिर निर्माण धोरण, डोनेशन धोरण, जगभरातील श्रीसाई मंदिर असोसिएशनची स्थापना आदी प्रस्तावित उपक्रमांबाबत संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. शिवा शंकर यांनी माहिती दिली.
श्रीसाई मंदिर निर्माण धोरण – श्री साईबाबांच्या शिकवणुकीचा प्रचार व प्रसारासाठी श्रीसाई संस्थानकडून देशभर श्रीसाई मंदिर उभारणीचे विचाराधीन आहे. याकरीता एखाद्या संस्थेने किंवा राज्य सरकारने पाच एकर जागा उपलब्ध करून दिल्यास तेथे श्रीसाई संस्थान शिर्डीसारखेच मंदिर उभारणार आहे. याशिवाय तेथे रुग्णालय, अन्नदान आदी उपक्रम राबवले जाणार आहेत. याशिवाय गावोगावी नव्याने उभारण्यात येणाऱ्या श्री साईबाबांच्या मंदिरांचे बांधकामासाठी पन्नास टक्के रक्कम अथवा ५० लाखापेक्षा जी रक्कम कमी आहे ती रक्कम मदत करण्याचा श्रीसाई संस्थान विचार करत आहे.
डोनेशन धोरण - यापुढे भाविक ज्या प्रमाणात देणगी देतील, त्याप्रमाणात त्यांना वर्षभर ठराविक दिवशी आरती व दर्शनाची सुविधा संस्थानकडून उपलब्ध करून देण्यात येणार आहे. यासाठी श्रीसाई संस्थान युनिक आयडी कार्ड बनवणार आहे. यापूर्वी श्रीसाई समाधीवर शाल पांघरण्यासाठी सोडत पद्धत अवलंबिण्यात येत होती. आता यातही मोठ्या देणगीदारांना ही संधी उपलब्ध करून देण्याबाबत श्रीसाई संस्थानने प्राथमिक प्रस्ताव तयार केलेला आहे.
श्रीसाई मंदिर असोसिएशन धोरण- जगभरातील व देशभरातील श्रीसाई मंदिरांची असोसिएशन स्थापन करण्याबाबतही श्रीसाई संस्थानचा विचार सुरू आहे.
उपरोक्त धोरणांबाबतची माहिती संस्थानचे www.sai.org.in या अधिकृत संकेतस्थळावर देण्यात आलेली आहे. या तिन्ही धोरणांबाबत भाविक व ग्रामस्थांच्या सूचना ceo.ssst@sai.org.in या ई-मेलवर मागवण्यात येत आहेत.
याचबरोबर रक्तदान, कर्मचारी सेवा प्रवेश नियम, आरती सशुल्क पासेस आदींबाबत पुढीलप्रमाणे अमंलबजावनी करण्यात येणार आहे.
रक्तदान - श्रीसाई मंदिर परिसरात भाविकांकडून रक्तदान केले जाते. यापुढे श्रीसाई मंदिर परिसरात भाविकांकडून दानात मिळालेले रक्त रुग्णांना मोफत देण्यात येणार आहे. श्रीसाई मंदिर परिसरात काही बाहेरील रक्तपेढ्यांनाही रक्त संकलन करण्यास परवाणगी देण्यात आलेली आहे. त्यांनाही हे रक्त रुग्णांना मोफतच द्यावे लागणार आहे. याबाबत संस्थानकडून संबंधित रुग्णांशी संपर्क करून खातरजमा करण्यात येणार आहे. या रक्त पिशव्यांवर संस्थानचा टॅग असेल व नॉट फॉर सेल असे लिहिलेले असेल.
सेवाप्रवेश नियम - महाराष्ट्र शासनाचे सुचनांप्रमाणे श्री साईबाबा संस्थानचे कर्मचारी यांचेसाठी सेवा प्रवेश नियम तयार केलेले आहेत. अंतीम करणेत आलेले सेवा प्रवेश नियम संस्थानचे www.sai.org.in या अधिकृत संकेतस्थळावर दि. २९/०९/२०२३ पासून उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. याबाबत अधिकारी, कर्मचारी, कर्मचारी संघटना यांच्या हरकती असल्यास पुढील सात दिवसाचे आत संस्थानकडे जमा करावयाच्या आहेत.
आरती सशुल्क पासेस - आरती पासेसमध्ये होणारा गैरवापर रोखण्यासाठी श्रीसाईबाबांचे आरतीच्या सशुल्क पासेससाठी शिफारस करताना यापुढे संबंधीत भाविकांचे आधार कार्ड व मोबाइल नंबर द्यावे लागणार आहेत. दि. ०१/१०/२०२३ पासून प्रायोगिक तत्त्वावर याची अंमलबजावणी करण्यात येणार आहे. टोकन नंबरसाठी बुकिंग केल्यावर पासेस कन्फरमेशनबाबत संबंधित भाविकाच्या मोबाइलवर मेसेज पाठवला जाणार आहे.