Languages

   Download App

श्री साईसच्चरित पारायण सोहळा

श्री साईसच्चरित पारायण सोहळा

 

*शिर्डी:-*
            श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डी व नाट्य रसिक संच, शिर्डी आणि शिर्डी ग्रामस्‍थ यांच्‍या  संयुक्‍त विद्यमाने शुक्रवार दिनांक २९ जुलै ते शनिवार दिनांक ०६ ऑगस्‍ट २०२२ या कालावधीत श्री साईआश्रम (१ हजार रुम) येथे आयोजित करण्‍यात आलेल्‍या श्री साईसच्चरित पारायण सोहळ्यात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थानच्‍या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत यांनी दिली.
            श्रीमती बानायत म्‍हणाल्‍या, श्रावणमासा निमित्त दरवर्षी श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डी व नाट्य रसिक संच, शिर्डी आणि शिर्डी ग्रामस्‍थ यांच्‍या संयुक्‍त विद्यमाने श्री साईसच्चरित पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. परंतु गेल्‍या दोन वर्षापुर्वी म्‍हणजेच सन २०२० साली संपूर्ण जगभरात व देशभरात कोरोना व्‍हायरसने थैमान घातला. कोरोना व्‍हायरसच्‍या संकटामुळे भारत सरकार व राज्‍य शासनाच्‍या वतीने लॉकडाऊन करण्‍यात आले. यामध्‍ये धार्मि‍क स्‍थळे, सामाजिक ठिकाणी गर्दी होऊ नये अथवा करु नये, असे निर्देश देण्‍यात आलेले होते. त्‍याच पार्श्‍वभुमीवर दिनांक १७ मार्च २०२० रोजी पासुन श्री साईबाबा समाधी मंदिर भाविकांना दर्शनाकरीता बंद ठेवण्‍याचा निर्णय घेण्‍यात आला होता. परंतु श्री साईसच्‍चरित पारायण सोहळ्याची परंपरा लक्षात घेवुन दोन वर्षात दोन वेळा श्री साईसच्‍चरित पारायण सोहळा आभासी (Virtual) पध्‍दतीने साजरे करण्‍यात आलेले होते. मात्र यावर्षी कोरोना विषाणुच्‍या प्रमाणात घट झाल्‍याने राज्‍य शासनाच्‍या वतीने कोरोनाचे निेयम शिथिल करण्‍यात आल्‍यामुळे यावर्षीचा श्री साईसच्‍चरित पारायण सोहळा हजारो पारायण वाचकांच्‍या उपस्थितीत साजरा करण्‍यात येणार आहे. या पारायण सोहळ्याचे हे २८ वे वर्ष आहे. त्‍यानुसार शुक्रवार दिनांक २९ जुलै ते शनिवार दिनांक ०६ ऑगस्‍ट २०२२ या कालावधीत नगर-मनमाड रोड लगत असलेले श्री साईआश्रम (१ हजार रुम) येथे श्री साईसच्चरित पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आलेले आहे.
            या पारायण सोहळ्यानिमित्त दररोज धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलेले असून प्रथम दिवशी दिनांक २९ जुलै रोजी सकाळी ०६.०० वाजता समाधी मंदिरातून पोथी व फोटोची पारायण मंडपापर्यंत मिरवणूक, ग्रंथ व कलश पूजन होवून पारायणास सुरुवात होईल. सायंकाळी ०५.०० ते ०६.०० यावेळेत पारायणार्थी महिलांचा हळदी-कुंकू समारंभ कार्यक्रम, रात्रौ ०७.३० ते ०९.३० यावेळेत आदर्श माध्‍यमिक विद्यालय, शिर्डी यांचा सांस्‍कृतिक कार्यक्रम साईआश्रम शताब्‍दी मंडपात व रात्रौ ०७.३० ते ०९.३० यावेळेत नृत्‍यात्मि डान्‍स स्‍टुडिओ, शिर्डी यांचा भरतनाटय कार्यक्रम हनुमान मंदिराच्‍या शेजारील श्री साईबाबा समाधी मंदिर शताब्‍दी मंडपात होणार आहे. दिनांक ३० जुलै रोजी सायं.०४.०० ते ०५.०० यावेळेत श्री.गोरक्षनाथ रायभान नलगे, शिर्डी यांचा श्री साईबाबांच्‍या जीवनावर आधारित प्रवचन कार्यक्रम हनुमान मंदिराच्‍या शेजारील श्री साईबाबा समाधी मंदिर शताब्‍दी मंडपात होणार आहे. दिनांक ३१ जुलै रोजी रात्रौ ०७.३० ते ०८.३० यावेळेत सौ.आशाबाई भानुदास गोंदकर, शिर्डी यांचा श्री साईचरित्रावर आधारित प्रवचन कार्यक्रम हनुमान मंदिराच्‍या शेजारील श्री साईबाबा समाधी मंदिर शताब्‍दी मंडपात होणार आहे. दिनांक ०१ ऑगस्‍ट रोजी दुपारी ०३.०० ते ०५.०० यावेळेत आचार्य श्रवणजी महाराज, दिल्‍ली यांचा श्री साईअमृत कथा कार्यक्रम हनुमान मंदिराच्‍या शेजारील श्री साईबाबा समाधी मंदिर शताब्‍दी मंडपात होणार आहे. दिनांक ०४ ऑगस्‍ट रोजी रात्रौ ०७.३० ते ०९.३० यावेळेत श्री.देव कुडाळेश्‍वर महिला दशावतार नाटय मंडळ, कुडाळ यांचा भगवान श्री कृष्‍ण चरित्रावर आ‍धारित गरुड गर्वहरण पौराणिक नाटक कार्यक्रम हनुमान मंदिराच्‍या शेजारील श्री साईबाबा समाधी मंदिर शताब्‍दी  मंडपात होणार आहे. दिनांक ०५ ऑगस्‍ट रोजी दुपारी ०३.०० ते ०५.०० यावेळेत आचार्य श्रवणजी महाराज, दिल्‍ली यांचा श्री साईअमृत कथा कार्यक्रम हनुमान मंदिराच्‍या शेजारील श्री साईबाबा समाधी मंदिर शताब्‍दी मंडपात होणार आहे.
            शुक्रवार दिनांक २९ जुलै ते गुरुवार दिनांक ०४ ऑगस्‍ट २०२२ याकालावधीत सकाळी ०७.०० ते ११.३० यावेळेत (पुरुष वाचक) व दुपारी ०१.०० ते ०५.०० यावेळेत (महिला वाचक) श्री साईसच्‍चरित पारायण वाचन होईल. तर शुक्रवार दिनांक ०५ ऑगस्‍ट रोजी सकाळी ०७.०० ते ०८.३० यावेळेत पुरुष वाचक व सकाळी ०९.०० वाजता महिला वाचक अध्याय क्रमांक ५३ (अवतरणिका) वाचन होवुन ग्रंथ समाप्ती होणार आहे. दुपारी ०३.३० ते ०७.३० यावेळेत शिर्डी गावातुन श्री साईसच्‍चरित या ग्रंथाची मिरवणूक काढण्‍यात येईल. तर शनिवार दिनांक ०६ ऑगस्‍ट रोजी सकाळी १०.०० ते १२.०० यावेळेत साईआश्रम शताब्‍दी मंडपात ह.भ.प.श्री.गंगाधर बुवा व्‍यास, डोंबिवली यांचे काल्‍याचे कीर्तन व त्‍यानंतर दुपारी १२.०० ते ०४.०० यावेळेत महाप्रसादाचा कार्यक्रम होणार आहे.
            या पारायण सोहळ्यात सहभागी होण्यासाठी वाचकांनी अमोल फार्मास्युटीकल्स नगर-मनमाड रोड इंडीयन ऑयल (गोंदकर पेट्रोल पंप), श्री रामचंद्र दत्‍तात्रय सारंगधर हेडगेवार नगर शिर्डी, लक्ष्मी आनंद मेडीकल स्टोअर्स श्री साईबाबा हॉस्पिटल समोर, हॉटेल साईराम लॉज एम.टी.डी.सी.च्यामागे शिर्डी, श्री विठ्ठल मंदिर कनकुरी रोड शिर्डी, शिर्डी, ऑल मार्ट होजीयरी कानिफनाथ मंदिरचौक शिर्डी, बाबा प्रिंटर्स बिरेगांव रोड कालीकानगर शिर्डी, श्री.गौरव मधुकर उपासनी नांदुर्खी रोड विठ्ठलवाडी, नविन प्रसादालय कार्यालय शिर्डी, हॉटेल साई सेवा साई कॉम्पलेक्सच्या पाठीमागे शिर्डी, सुर्याफुडस्‍ (बेकरी) शिर्डी रेल्वे स्टेशनगेट जवळ नगर-मनमाड रोड शिर्डी, कोमल किराणा नविन पिंपळवाडी रोड वराह चौक शिर्डी, श्री.दत्‍तात्रय शिवाजी कोते नगरसेवक कार्यालय विठ्ठलवाडी नांदुर्खी रोड शिर्डी, अमोल फार्मास्युटीकल्स शाखा नं.०२ रिंग रोड (२४ मीटर) हॉटेल स्‍वामी नारायण शेजारी, मोदी सर साईश्रध्‍दा हौसिंग सोसायटी ५०० रुम मागे, सौ.चित्रा इंगळे गणेशवाडी नांदुर्खी रोड व आण्‍णासाहेब पांडुरंग गोर्डे स्‍वामी समर्थ किराणा दत्‍तनगर पिंपळवाडी रोड या ठिकाणी आपली नावे नोंदवावीत.
            पारायण मंडपात सकाळी ७.०० ते ११.३० यावेळेत पारायणाच्‍या वेळी फक्‍त पुरुषच पारायण करतील व दुपारी ०१.०० ते ०५.०० यावेळेत फक्‍त महिलाच पारायण करतील. पारायणासाठी वाचकांनी ग्रंथ, श्रीफळ आणि बस्कर स्वत: आणावयाचे असून शालेय विद्यार्थी व १८ वर्षाच्या आतील वाचकांना प्रवेश दिला जाणार नाही. याबरोबरच ०२ तास अखंड विणा सेवेसाठी इच्छुकांनी आपली नावे नोंदणी कार्यालयात नोंदवावीत, असे सांगून या पारायण सोहळ्यात जास्तीत जास्त साईभक्‍त व ग्रामस्‍थांनी सहभागी व्‍हावे, असे आवाहन ही श्रीमती बानायत यांनी केले.
            हा पारायण सोहळा यशस्वीरित्या पारपाडण्यासाठी संस्थानचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे, उपाध्‍यक्ष अॅड.जगदीश सावंत, मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्‍यश्री बानायत व सर्व विश्वस्त यांच्या मार्गदर्शनाखाली उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी राहुल जाधव, सर्व प्रशासकीय अधिकारी, सर्व विभाग प्रमुख, नाटय रसिक संचाचे सर्व पदाधिकारी, सर्व ग्रामस्‍थ व सर्व कर्मचारी प्रयत्नशिल आहेत.

Undefined
श्री साईसच्चरित पारायण सोहळा
Wednesday, July 27, 2022 - 18:30