श्री साईबाबांची पुण्यतिथी
श्री साईबाबांची १०४ वा पुण्यतिथी उत्सव मंगळवार दिनांक ०४ ऑक्टोबर ते शुक्रवार दिनांक ०७ ऑक्टोबर २०२२ या काळात साजरा होणार आहे. या निमित्ताने पुण्यतिथी सोहळ्याची पुर्वपिठीका.
साईबाबांनी १०३ वर्षांपुर्वी दस-याच्या दिवशी दुपारी २ वाजून ३५ मिनिटांनी शिर्डी येथे आपला देह ठेवला. त्या दिवशी मंगळवार होता. १९१९ साली तिथीप्रमाणे बाबांची पहिली पुण्यतिथी साजरी करण्यात आली. त्यानंतर आजतागायत हा पुण्यतिथी उत्सव नव्या उत्साहात साजरा केला जात आहे. ज्यामुळे विजयादशमी म्हणजे साईबाबांची पुण्यतिथी अशी एक नवी ओळख जा या सणाची निर्माण झाली आहे. देशभरातील व जगातील साईभक्त हा उत्सव साजरा करतात. श्रीक्षेत्र शिर्डी येथे या पुण्यतिथी उत्सवानिमित्त तीन दिवस विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे.
श्री साईसच्चरिताच्या ४२ व्या अध्यायात बाबांच्या महानिर्वाणाचे वर्णन करण्यात आले आहे. हेमाडपंत म्हणतात, बाबांचे एक भक्त रामचंद्र पाटील कोते एकदा अतिशय आजारी पडले. जीवावरचे संकट त्यांना सोसवत नव्हते. कोणताच उपाय बाकी राहीला नव्हता. जीव अगदी नकोसा होवून गेला. अशा अवस्थेत एका मध्यरात्री बाबांची मुर्ती एकाएकी रामचंद्र पाटलांच्या उशापाशी प्रकटली. रामचंद्र पाटलांनी बाबांचे पाय धरले आणि निराश होवून म्हणाले ‘मला मरण नक्की कधी येईल तेवढे सांगा. या आयुष्याचा कंटाळा आला आहे.’ त्यावर मुर्तीमंत करुणा असलेले बाबा म्हणाले, रामचंद्रा...उगाच चिंतातूर का होतोस काळजी करु नकोस तुझं गंडान्तर टळलं आहे. पण तात्या पाटलाची मला धडगत दिसत नाही. शके अठराशें चाळीस (शके १८४०) च्या दस-याच्या दिवशी तात्या मोक्षपदाला पावेल. परंतु ही गोष्ट तात्या जवळ बोलु नकोस. तो मनात धास्ती घेवून बसेल.
दिवस भराभर उलटू लागले. तशी तात्या पाटलांच्या मरणाची वेळ जवळ येवू लागली. रामचंद्र पाटलांची धास्तीही वाढू लागली. कारण बाबांचे बोल म्हणजे वज्रलेप! ते त्यांनी तात्या पाटलांपासून गुप्त ठेवले. पण कोणाकडे तरी मन मोकळं केल्याशिवाय त्यांना चैन पडेना. शेवटी ही गोष्ट त्यांनी बाळा शिंप्याला सांगितली आणि हे कोणालाही सांगू नकोस असं बजावलं. एकोणीसशें अठरा (१९१८) चा भाद्रपद सरला अश्विन लागणार तोच तात्या पाटलांनी अंथरुण धरले. तर दुसरीकडं बाबांनाही थंडी वाजून आली. तात्यांचा भरवसा बाबांवर आणि बाबांचा रक्षणकर्ता श्रीहरी होता. दुखण्याने त्रासलेल्या तात्यांचे चित्त बाबांकडे लागले होते. भेटीची ओढ लागली होती. परंतु त्यांना चालवतही नव्हते. दिवसेंदिवस दुखणे वाढत होते. औषधांना दाद न देता अनावर होत होते. बाबांनी भाकीत केलेला दिवस जवळ येत होता....बाबांचे म्हणणे आता खरं होणार या विचाराने रामचंद्र पाटील आणि बाळा शिंप्याची धास्ती वाढू लागली. शुध्द पक्षाची दशमी आली. तात्यांची नाडी कमी वाहू लागली. आप्तेष्ट घाबरून गेले. परंतु तात्यांच्या बाबतीत कुठलीच वाईट घटना घडणार नव्हती. आलेल्या काळाला परत जावे लागणार होते. आणि तसच झालं. तात्यांचे गंडान्तर टळले. तात्या राहीले आणि बाबांनी देह त्याग केला.
देहावसन जवळ आले तरी लक्ष ठेवून चारा-पाचांचा मेळ घालून बाबांनी लक्ष्मीबाई शिंदेना आपली आठवण म्हणून नऊ रुपये दिले. जवळ असलेल्या मंडळीना जेवायला पाठवून दिले. मनाने अस्वस्थ होते तरी आज्ञा झाल्याने ते जाण्यासाठी उठले. आज्ञेचे उल्लंघन करवेना, सोबतही सोडवेना आणि बाबांचे मनही मोडवेना. शेवटी सर्वजण वाड्यात जेवायला गेले. पण मन बाबांजवळ गुंतलेले होते. सारे जेवायला बसले. तेवढ्यात बोलावणे आले. हातातला घास तसाच टाकून सर्वजण व्दारकामाईकडे धावले. परंतु वेळ निघून गेली होती. बयाजी पाटलांच्या मांडीवर बाबांनी आपला देह ठेवला होता. दस-याचे बाबांना प्रेम का होते? तर साडेतीन मुहुर्तांपैकी दस-याचा हा मुहुर्त कोठेही जाण्यासाठी विशेष शुभ समजला जातो, हे सगळ्यांना चांगलेच ठाऊक आहे, परंतु हेही म्हणणे बरोबर नव्हे. ज्याला जाणे व येणेच नाही त्याला कोठून आले आहे निर्याण! मुहुर्ताचीही त्याला काया जरुरी ज्याला धर्माचे किंवा अधर्माचे बंधन नाही, ज्याची सर्व बंधने निवळली आहेत ज्याच्या प्राणाला निघून जाणे नाही त्याला निर्याण ते कसले! अशा साईमहाराजांना येणे किंवा जाणे नाही, मग निर्याण स्थिती तरी कोठली! आयुष्यामर्यादारुपी तेल संपल्यावर प्राणरुपी ज्योत मंद झाल्यावर बाबांचा देह बयाजी पाटलाच्या मांडीवर विसवला. नाही पडून किंवा निजून पण स्वस्थपणे गादीवर बसून, असा प्रकारे आपल्या हस्ते दानधर्म करुन बाबांनी आपल्या देहाचे विसर्जन केले. साईसमर्थांचे मनोगत कोणालाही न कळता त्यांनी हातोहात आपला देह टाकला आणि ते ब्रह्मीभूत झाले. देहाचा व मायेचा बुरखा पांघरुन संत या जगात अवतार घेतात आणि लोकांचा उध्दार करण्याचे कार्य संपले म्हणजे लगेच अव्यक्तात समरस होऊन जातात. बाबांनी आपला देह आपल्या भक्तांकरीता आजन्म कष्टविला. त्या स्मरणार्थ दरवर्षी त्यांची पुण्यतिथी साजरी करण्याचा निर्णय तत्कालीन भक्तांनी घेतला. पुर्वपरंपरा पाहिली तर पुण्यतिथी साजरी करणे हे महत्पुण्य आहे. वर्षभर घरोघरी प्रत्येक जण आराधना करतच असतो. परंतू त्याची पुर्तता करण्याकरता व सदगुरुंच्या आशिर्वाद घेण्याकरीता पुण्यतिथीच्या दिनी समाधीस्थानीच आले पाहिजे.