Languages

   Download App

श्री साईसच्‍चरित पारायण सोहळा कोरोना व्‍हायरसच्‍या पार्श्‍वभूमीवर मागील वर्षाप्रमाणे आभासी (Virtual) पध्‍दतीने साजरे करण्‍यात येणार

श्री साईसच्‍चरित पारायण सोहळा कोरोना व्‍हायरसच्‍या पार्श्‍वभूमीवर मागील वर्षाप्रमाणे आभासी

शिर्डीः-

            श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डी तसेच नाटय् रसिक मंच, शिर्डी आणि शिर्डी ग्रामस्‍थ  यांच्‍या सहकार्याने दरवर्षी श्रावण शुध्‍द प्रतिपदेपासून सुरू होणारा श्री साईसच्‍चरित पारायण सोहळा कोरोना व्‍हायरसच्‍या पार्श्‍वभूमीवर मागील वर्षाप्रमाणे आभासी (Virtual) पध्‍दतीने साजरे करण्‍यात येणार असल्‍याची माहिती संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी कान्‍हूराज बगाटे यांनी दिली.

            श्री.कान्‍हूराज बगाटे म्‍हणाले, गेल्‍या वर्षी जगभरात व देशात आलेल्‍या कोरोना विषाणूच्‍या संकटामुळे श्रीं चे समाधी मंदिर बंद करण्‍यात आले होते. नंतर राज्‍यशासनाच्‍या आदेशाने दि.१६ नोव्हेंबर २०२० पासून श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी काही अटी शर्तींवर/खुले करण्‍यात आले होते. परंतु सध्‍या पुन्‍हा राज्‍यातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता राज्य शासनाने नवीन मार्गदर्शक सूचना केलेल्‍या आहेत. यामध्‍ये धार्म‍िक स्‍थळे, सामाजिक ठिकाणे आदि ठिकाणी गर्दी होवू नये अथवा करु नये, असे निर्देश देण्‍यात आलेले आहे. याच पार्श्‍वभूमीवर श्री साईबाबा संस्‍थानच्‍या वतीने दि.०५ एप्रिल २०२१ रोजीपासुन श्री साईबाबा समाधी मंदिर दर्शनाकरीता साईभक्‍तांना बंद ठेण्‍यात आलेले आहे. त्‍यामुळे मागील वर्षाप्रमाणे यावर्षी आयोजित करण्‍यात येणारा २७ वा श्री साईसच्‍चरित पारायण सोहळा आभासी (Virtual) पध्‍दतीने साजरा करण्‍यात येणार आहे.

श्री साईसच्‍चरित पारायणाचे वाचन हे दिनांक ०९ ऑगस्‍ट ते दिनांक १६ ऑगस्‍ट २०२१ या कालावधीत सकाळी ०७.०० ते ११.०० यावेळेत श्री साईसमाधी स्‍टेजवर संस्‍थान पुजा-यांमार्फत करण्‍यात येणार आहे. तसेच यावेळेत पारायण वाचनाचे युट्युब (youtube) - https://youtube.com/user/saibabasansthantrust, फेसबुक पेज (Facebook Page) - https://www.facebook.com/shrisaibabasansthantrustshirdi/ व वेबसाईट (website) - www.sai.org.in या लिंकवर थेट प्रक्षेपण करण्‍यात येणार असल्‍याचे सांगुन सर्व साईभक्‍तांनी आपल्‍या घरीच यावेळेत पारायण वाचन करावे असे आवाहन ही श्री.बगाटे यांनी केले.

Undefined
श्री साईसच्‍चरित पारायण सोहळा
Wednesday, August 4, 2021 - 13:15