शिर्डी साईबाबा संस्थानच्या संकेतस्थळावर 'Talk with Sai' AI चॅटबॉटचे उद्घाटन
शिर्डी - श्री साईबाबा संस्थानच्या अधिकृत संकेतस्थळावर ‘Talk with Sai’ या अत्याधुनिक AI चॅटबॉटचे उद्घाटन संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी केले. या नव्या सुविधेमुळे साई भक्त आणि पर्यटकांना श्री साईबाबा व शिर्डी संदर्भातील सर्व महत्त्वाची माहिती एका क्लिकवर सहज मिळणार आहे.
उद्घाटनप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे, प्रशासकीय अधिकारी संदिपकुमार भोसले, प्रज्ञा महांडुळे-सिनारे, विश्वनाथ बजाज, लेखाधिकारी अविनाश कुलकर्णी, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, आयटी विभागप्रमुख अनिल शिंदे, रमेश पुजारी आणि संजय गिरमे तसेच टीसीएस कंपनीचे किरण कुमार रेड्डी व तन्मय मिराणे आदी मान्यवर उपस्थित होते.
‘Talk with Sai’ या चॅटबॉट सुविधेमुळे जगभरातील साई भक्तांना श्री साईबाबांचे जीवनकार्य, शिकवणूक तसेच साईबाबा संस्थानविषयक सर्व माहिती सहज मिळणार आहे. यात ऑनलाइन सेवा, मंदिरातील कार्यक्रम, उत्सव व धार्मिक स्थळांबाबत माहिती मिळणार असून भाविकांना त्यांच्या शंका आणि प्रश्नांची त्वरित उत्तरे मिळतील. सध्या ही सुविधा इंग्रजी व मराठी भाषेत उपलब्ध असून लवकरच इतर प्रादेशिक भाषांमध्ये देखील ती सुरू करण्यात येणार आहे.
श्री साईबाबा संस्थान भक्तांच्या सेवेसाठी नेहमीच नवनवीन सुविधा उपलब्ध करून देत असते. या नवीन AI तंत्रज्ञानाच्या मदतीने साईभक्तांना अधिक जलद, अचूक आणि सुलभ माहिती मिळेल, अशी अपेक्षा मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी व्यक्त केली.