श्री गुरुपौर्णिमा उत्सव २०२५
शिर्डी –
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने बुधवार दि. ०९ जुलै ते शुक्रवार दि. ११ जुलै या कालावधीत आयोजित केलेल्या श्री गुरूपौर्णिमा उत्सव कालावधीत दक्षिणापेटी, देणगी काऊंटर, ऑनलाईन, चेक डीडी, मनिऑर्डर, डेबीट-क्रेडीट कार्ड, युपीआय, सोने, चांदी व दर्शन/आरतीपास शुल्क इ. सर्व मार्गांनी मिळून एकूण रक्कम रु.६,३१,३१,३६२/- (अक्षरी – सहा कोटी, एकतीस लाख, एकतीस हजार, तिनशे बासष्ट मात्र) इतकी देणगी प्राप्त झाली असल्याची माहिती श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.
सदर देणगी मध्ये रोख स्वरुपात रुपये ०१ कोटी ८८ लाख ०८ हजार १९४ दक्षिणा पेटीत प्राप्त झाली असून, देणगी काऊंटर ०१ कोटी १७ लाख ८४ हजार ५३८ रुपये, पी.आर.ओ. सशुल्क पास ५५ लाख ८८ हजार २००, डेबीट क्रेडीट कार्ड,ऑनलाईन देणगी, चेक डी.डी.देणगी, मनी ऑर्डर असे एकूण ०२ कोटी ०५ लाख ७६ हजार ६२६ रुपये, सोने ६६८.४०० ग्रॅम रक्कम रुपये ५७ लाख ८७ हजार ९२५ व चांदी ६,७९८.६८० ग्रॅम रक्कम रुपये ०५ लाख, ८५ हजार ८७९ यांचा समावेश आहे.
श्री गुरूपौर्णिमा उत्सव कालावधीत साधारणतः ०३ लाखाहून अधिक साईभक्तांनी साईदर्शनाचा लाभ घेतला. उत्सव कालावधी मध्ये श्री साईप्रसादालयाद्वारे सुमारे ०१ लाख ८३ हजार ५३२ साईभक्तांनी प्रसाद भोजनाचा लाभ घेतला तर दर्शन रांगेत ०१ लाख ७७ हजार ८०० साईभक्तांना मोफत बुंदी प्रसाद पाकीटांचे वाटप करण्यात आले. या कालावधीत सशुल्क प्रसादरुपी लाडू पाकीटांच्या विक्रीतून ६४ लाख ०५ हजार ४६० रूपये प्राप्त झाले. उत्सव काळात हजारो साईभक्तांनी संस्थानच्या साईप्रसाद निवासस्थान, साईबाबा भक्तनिवासस्थान, व्दारावती निवासस्थान, साईआश्रम निवास व साईधर्मशाळा आदी ठिकाणांबरोबर अतिरिक्त निवास व्यवस्थेकरीता उभारण्यात आलेल्या मंडपात निवास व्यवस्थेचा लाभ घेतला. तसेच साईधर्मशाळा येथे विविध भागातून आलेल्या पालख्यांमधील पदयात्री साईभक्तांनी निवास व्यवस्थेचा लाभ घेतला.
सदर देणगीचा वापर श्री साईबाबा संस्थानचे प्रसादालय, रुग्णालये, शैक्षणिक संकुल यासेवाकार्या बरोबरच साईभक्तांच्या विविध सेवा सुविधांसाठी होत असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सांगितले.#pe$k