शिर्डी – श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी यांच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी दीपावली निमित्त परंपरेनुसार श्री साईबाबांच्या समाधी मंदिरात लक्ष्मी-कुबेर पूजन संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर व सौ. वंदना गाडीलकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. भीमराज दराडे, सर्व प्रशासकीय अधिकारी, आदी विभागप्रमुख, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ तसेच साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
लक्ष्मी-कुबेर पूजनानंतर सायंकाळी ६.०० वाजता श्रींची धुपारती पार पडली. धुपारतीनंतर साईभक्तांसाठी दर्शनरांग सुरु करण्यात आली. रात्री १०.०० वाजता श्रींची शेजारती संपन्न होणार आहे.
लक्ष्मी पूजनावेळी श्रींच्या मूर्तीवर हिरेजडित सुवर्णाभूषणे व विविध अलंकार चढविण्यात आले होते, दीपावली सणाच्या निमित्ताने संपूर्ण मंदिर परिसर आकर्षक विद्युत रोषणाईच्या प्रकाशात आणि भक्तांच्या भक्तिभावाने उजळून निघाला होता.