Languages

  Download App

डॉ. राम नाईक यांच्या अतुलनीय रुग्णसेवेची 'वर्ल्ड बुक रेकॉर्ड'मध्ये नोंद; संस्थानकडून निवृत्तीनंतरही रुग्णसेवेची संधी

डॉ. राम नाईक यांच्या अतुलनीय रुग्णसेवेची 'वर्ल्ड बुक रेकॉर्ड'मध्ये नोंद;

डॉ राम नाईक 'वर्ल्ड बुक रेकॉर्ड'ने सन्मानित.

 

 समर्पित अतुलनीय सेवेची दखल घेऊन संस्थानने दिली निवृत्तीनंतरही रुग्णसेवेची संधीः

 डॉ. राम नाईक, ज्यांनी आपल्या आयुष्यातील २३ वर्षे साईसंस्थानच्या साईनाथ रुग्णालयात रुग्णसेवेत घालवली, त्यांनी तब्बल २ लाख ७३ हजार रुग्णांवर उपचार आणि ६० हजार शस्त्रक्रियांचा विक्रम प्रस्थापित केला. त्यांच्या या अतुलनीय सेवेची दखल लंडनच्या 'वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड'ने घेऊन त्यांना सन्मानित केले.

डॉ. नाईक यांचे दि.३१/०३/२०२५ अखेर विहीत वयोमान (६० वर्षे) पूर्ण होत असल्‍याने ते संस्‍थान मधून सेवानिवृत्‍त होणार होते. परंतू त्‍यांची रुग्णसेवेप्रती असलेली निष्ठा आणि समर्पण पाहून शिर्डी ग्रामस्थ व पंचक्रोशीतील रुई, नादुर्खी खुर्द व बुद्रुक, साकुरी, पिंपळवाडी, सावळेविहीर खुर्द व बुद्रुक, शिंगवे, निघोज, निमगाव, वाकडी या ११ गावांतील ग्रामपंचायतीने ठरावाद्वारे तसेच रुग्णालयांतील कर्मचाऱ्यांनीही निवेदनाद्वारे त्यांना मुदतवाढ देण्याची मागणी केली होती. त्यांची समर्पित रुग्णसेवा व लोकांच्या मागणीचा मान राखत संस्थानने डॉ. नाईक यांना दोन वर्षांची मुदतवाढ देण्याचा निर्णय घेतला आहे.

डॉ. नाईक यांचा गौरव सोहळा रुग्णालयातील डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी आयोजित केला होता. रुग्णालयाच्या गणवेशातच आलेल्या डॉ. नाईक यांचा संस्‍थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर (भा प्र से) यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी श्री गाडीलकर यांनी साईबाबांच्या 'सेवा परमो धर्मः' या शिकवणीनुसार रुग्णसेवा करणाऱ्या डॉ. नाईक यांच्या कार्याबद्दल संस्थान कायम ऋणी राहील. देवानंतर डॉक्टर देव असतो राम नाईक तर डॉक्टरांमधला देव आहे. कोणत्याही अपेक्षेशिवाय इतकी उत्तुंग व समर्पित सेवा करणे हे सामान्य माणसांचे काम नाही. त्यांनी आपल्या सेवेने हजारो लोकांच्या हृदयात स्थान मिळविले असल्‍याचे प्रतिपादन केले. 

याप्रसंगी 'वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड'चे महेश वैद्य, रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक डॉ. शैलेश ओक, उपवैद्यकीय संचालक डॉ. प्रीतम वडगावे, अधीक्षिका डॉ. मैथिली पितांबरे जनसंपर्क अधिकारी सुरेश टोलमारे आधीसेविका नजमा सय्यद तसेच मोठ्या संख्येने डॉक्टर, कर्मचारी उपस्थित होते.

Undefined
डॉ. राम नाईक यांच्या अतुलनीय रुग्णसेवेची 'वर्ल्ड बुक रेकॉर्ड'मध्ये नोंद; संस्थानकडून निवृत्तीनंतरही रुग्णसेवेची संधी
Thursday, April 3, 2025 - 15:15