श्री साईंबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिरडी ही श्री साईबाबांचे समाधी मंदिर व या परिसरातील इतर सर्व मंदिरांचचे व्यवस्थापन पाहणारी प्रशासकीय संस्था असून शिर्डी गावच्या विकासासाठी कार्यरत आहे.
शिर्डी -
शिर्डी एक छोटे शहर असून महाराष्ट्र राज्यातील अहमदनगर जिल्ह्यातील राहता तालुक्यात आहे. शिर्डी हे एक धर्मनिरपेक्ष तिर्थक्षेत्र आहे जेथे सर्व धर्मांना एक समान मानले जाते. येथे सर्व भक्त श्रीचरणी नतमस्तक होतात, श्रींचे दर्शनाने साईभक्तांना असीम आनंद आणि चिरंतन समाधान मिळते, श्री साईबाबांच्या पद्स्पर्शाने पावन झालेल्या या पवित्र भुमीत भक्तांना "सबका मलिक एक" या अनमोल शब्दांची आठवण होते. संपूर्ण भारत आणि परदेशातून लाखो भाविक येथे सातत्याने श्रींचे दर्शनासाठी गर्दी करतात. देशभरातून साईभक्त शिर्डी येथे बस, रेल्वे तसेच विमानाने येतात.
श्री साईबाबा शिर्डी येथे मानवी अवतारात प्रकट झाले. साईबाबांनी शिर्डी येथे ६० वर्षे राहुन मानवजातीची सेवा केली आणि येथूनच जगाला मानवता व एकात्मकेची अमूल्य शिकवण दिली व शिर्डीमध्येच समाधीस्त झाले. श्री साईबाबांच्या पावलांचा ठसा आणि त्यांच्या कृत्यामुळे सर्व जाती आणि धर्मातील भक्तांसाठी शिर्डी हे अनन्य पवित्र स्थान बनले आहे. श्री साईबाबांनी येथुनच भक्तांना "श्रद्धा-सबुरी" चे आचरण करणेबाबत उपदेश केला. श्री साईबाबांनी भक्तांना वचन दिले होते - "मी समाधी घेतल्यानंतर, माझी हाडे थडग्यातून बोलतील आणि लोक येथे गर्दी करतील." त्यांचा संदेश आजतागायत अनुभवला जात आहे. शिर्डी हे असे एक क्षेत्र आहे की जिथे आजही असंख्य साईभक्त रिकाम्या हाताने येतात पण जाताने त्यांच्या चेह-यावर निरंतर समाधानाचा भाव असतो.
श्री साईबाबा संस्थान विषयी
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी ही श्री साईबाबांचे समाधी मंदिर आणि या परिसरातील इतर सर्व मंदिरांची वव्यवस्थापन पाहणारी प्रशासकीय संस्था असून शिर्डी गावच्या विकासासाठी कार्यरत आहे.
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी मार्फत श्री साईबाबांचे समाधी मंदिर आणि या परिसरातील इतर सर्व मंदिरांतील दैनंदीन धार्मिक पुजा/विधी, वार्षिक उत्सव इ. बाबतचे व्यवस्थापन पाहते.
शिर्डी येथे श्रींचे दर्शनासाठी जगभरातून येणा-या साईभक्तांचे संख्येमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. शिर्डी येथे आलेले साईभक्त आजही साईचरणी लीन होऊन साईबाबांचे “जरी हे शरीर गेलो मी टाकून | तरी मी धावेन भक्तांसाठी” या वचनाचा अनुभव घेतात.
शिर्डीला येणा-या साईभक्तांना मूलभूत अत्यावश्यक सोई-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था तत्पर आहे.
शिर्डीत साईभक्तांना सोई-सुविधा प्राप्त करुन देण्याची परंपरा बाबांच्या हयातीपासून आहे. आपल्या हयातीत बाबांनी ही जबाबदारी शिर्डीनिवासी भक्तांवर सोपविली होती. बाबांचे निर्वाणानंतर दिनांक २४,२५,२६ डिसेंबर १९१८ साईभक्त एकत्र जमले श्री साईंच्या समाधीच्या पूजेअर्चेच्या व्यवस्थेसाठी श्रीमंत बापूसाहेब बुट्टींच्या अध्यक्षेतेखाली एका कमिटीची नेमणुक करण्यात आली. सन १९२१ साली श्री साईबाबा संस्थानची स्थापना होऊन अहमदनगर जिल्हा कोर्टाकडून स्थापनेस मंजूरी मिळाली.
दिनांक ६ नोव्हेंबर १९६० पासून श्री साईबाबा संस्थानचा कारभार मुंबई सिटी कोर्टाने ताब्यात घेतला आणि दैनंदिन कामकाजासाठी कोर्ट रिसीव्हरची नेमणुक केली.
दिनांक १६ ऑगष्ट १९८४ रोजी श्री साईबाबा संस्थानचार कारभार परत विश्वस्त मंडळाकडे दिला. पहिले चार वर्षे डॉ.पी.के.सावंत व पाचव्या वर्षी श्री.आर.आर.पाटील यांचे अध्यक्षतेखालीविश्वस्त मंडळ महाराष्ट्र राज्य धमर्दाय आयूक्त यांनी नियुक्त केले. दैनंदिन कारभारासाठी कार्यकारी अधिका-यांची नेमणूक केली. दिनांक २ सप्टेंबर १९८९ ला प्रो.डॉ.लेखा पाठक यांची अध्यक्षा म्हणून व इतर विश्वस्तांची नियुक्ती करण्यात आली. दिनांक २ सप्टेंबर १९९४ ला आणि पुन्हा दिनांक २ सप्टेंबर १९९९ ला श्री.द.म.सुकथणकर यांचे अध्यक्षतेखाली विश्वस्त मंडळाची नेमणूक करण्यात आली.
(संदर्भ- श्री साईंचे सत्य चरित्र)
ऑगष्ट २००४ मध्ये महाराष्ट्र राज्य विधीमंडळाने स्वतंत्र कायदा करुन श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था अॅक्ट मंजूर केला व महाराष्ट्र शासनाने श्री साईबाबा संस्थान विवश्वस्तव्यवस्थेची नेमणूक दिनांक २ सप्टेंबर २००४ पासून केली. मा.आमदार श्री जयंतराव ससाणे यांची अध्यक्षपदी व मा.श्री.शंकरराव कोल्हे यांची उपाध्यक्षपदी नेमणूक करणेत आली होती. त्याच बरोबर इतर सदस्यांची नेमणूक करणेत आली असून, विश्वस्तव्यवस्थेची ध्येय धोरणांची अंमलबजावणी करणेसाठी कार्यकारी अधिका-यांची नेमणूक करणेत आली.
या महत्वपूर्ण आणि लोकप्रिय विश्वस्तव्यवस्थेला आपले धर्मदाय कार्यक्रम अधिक परिणामकारक रितीने आणि कार्यक्षमतेने पार पाडणे, साईभक्तांना अधिक सुविधा देणे, तसेच सर्वसामान्य जनतेसाठी आपल्या अतिरीक्त निधीतून अधिक व्यापक कल्याणकारी कामे हाती घेणे शक्य व्हावे म्हणून स्वतंत्र कायदा करून शासनाच्या नियंत्रणाखाली विश्वस्तव्यवस्था पुनर्घटीत केली आहे.
साईभक्तांना शिर्डीला साईदर्शनास येणे सुलभ व्हावे, कोणत्याही साईभक्तांची गैरसोय होऊ नये, स्वत:च्या इच्छेप्रमाणे दैनंदिन पूजाविधीत सहभागी होता यावे यासाठी विश्वस्तव्यवस्था प्रयत्नशील असते. विश्वस्तव्यवस्थेमार्फत साईभक्तांचे निवासव्यवस्थेसाठी साई आश्रम भक्तनिवास, साईबाबा भक्तनिवास, द्वारावती निवासस्थान, साईबाबा धर्मशाळा, साईनिवास, साईउद्यान आदि भव्य निवासस्थाने निर्माण केलेली असून, तेथे अल्पदरात अत्यावश्यक सोयीसह साईभक्तांची निवासव्यवस्था करणेत येते. संस्थानचे सर्व निवासस्थाने येथून मंदिर व श्री साई प्रसादालय येथे साईभक्तांना येणे-जाणे करिता विनामूल्य बस सेवा उपलब्ध आहे.
साईभक्तांना त्यांचे शिर्डी भेटीचे व श्रींचे दर्शनाचे नियोजन शिर्डी येथे येण्याचे अगोदर करता यावे याकरिता इंटरनेटद्वारे आरती/दर्शन पास व रुमचे अगाऊ बुकींगची सुविधा online.sai.org.in या वेबसाईटद्वारे उपलब्ध करुन देणेत आलेली आहे. संस्थानमार्फत साईभक्तांसाठी अल्प दरामध्ये नाष्टा पाकीटे, चहा, कॉफी, दुध व बिस्कीटे उपलब्ध करुन देणेत आलेली आहे. तसेच दर्शनरांगेमध्ये मोफत चहा व प्रसाद बुंदीचे वितरण करणेत येते. संस्थानचे श्री साईप्रादालय येथे मोफत प्रसाद भोजनाची व्यवस्था करणेत आलेली असून, सदरची व्यवस्था सकाळी १० ते रात्री १० या वेळेत उपलब्ध असते.
श्री साईबाबांचे जीवनकार्य व शिकवणूक याचा प्रचार प्रसार व्हावा तसेच संस्थानबाबतची माहिती व संस्थानमार्फत साईभक्तांसाठी उपलब्ध सुविधा याची माहिती साईभक्तांना व्हावी याकरिता संस्थानमार्फत संस्थानची आधिकृत वेबसाईट (sai.org.in) कार्यान्वीत करणेत आलेली आहे. सदरचे वेबसाईटवर श्रींचे लाईव्ह दर्शनाची सुविधाही उपलब्ध करून देणेत आलेली आहे. तसेच, संस्थानमार्फत उपलब्ध सुविधांचा लाभ साईभक्तांना इंटरनेटद्वारे घेता यावा याकरिता संस्थानची आधिकृत वेबसाईट (online.sai.org.in) तसेच मोबाईल अॅप्लीकेशन कार्यान्वीत करणेत आलेले आहे. मोबाईल अॅप्लीकेशनवर इतर सुविधांबरोबरच श्रींचे लाईव्ह दर्शनाची सुविधा उपलब्ध करून देणेत आलेली आहे.
श्री साईबाबांचे रुग्णसेवेचे कार्य संस्थानमार्फत आजही अविरत सुरु आहे. संस्थानमार्फत शिर्डी व परिसरातील गरजू रुग्णांकरिता अत्याधुनिक उपकरणे व सोयींयुक्त श्री साईबाबा सुपर स्पेशॉलिटी हॉस्पिटल व श्री साईनाथ रुग्णालय धर्मादाय तत्त्वावर चालविले जातात. दोन्ही रुग्णालयामध्ये तज्ञ व अनुभवी डॉक्टरामार्फत रुग्णावर उपचार करणेत येतात. सदरचे रुग्णालयामध्ये विविध प्रकारच्या शस्त्रक्रिया करणेकरिता अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त सुसज्ज असे शस्त्रक्रिया कक्ष कार्यान्वीत आहेत. सदर रुग्णालयाचा लाभ शिर्डी व परिसराबरोबरच महाराष्ट्रातील अति दुर्गम भागातील गरजु रुग्णांनाही फार मोठया प्रमाणात होत आहे. संस्थानमार्फत महाराष्ट्रातील अर्थिकदृष्टया दुर्बल रुग्णांना संस्थानव्यतिरीक्त इतर रुग्णालयात उपचाराकरिता अर्थिक स्वरुपातही मदत दिली जाते.
श्री साईबाबा संस्थान मार्फत शिर्डी व शिर्डी परिसरातील विद्यार्थ्यासांठी श्री साईबाबा कन्या विद्यालय, कनिष्ठ व वरिष्ठ महाविदयालय, श्री साईबाबा इंग्लिश मिडीयम स्कुल, श्री साईबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) ह्या शैक्षणिक संस्था सुरु करण्यात आलेल्या आहेत. सदर शैक्षिणिक संस्थामध्ये अत्यल्प शुल्कामध्ये विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण दिले जाते.
वरिल सर्व कार्य अधिक प्रभावीपणे पार पाडण्यासाठी व दैनंदिन कामकाज व्यवस्थित होण्यासाठी संस्थानअंतर्गत एकुण ४० पेक्षा जास्त विभाग कार्यरत आहेत.