श्री साईबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत दीक्षांत समारंभ संपन्न
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी संचलित श्री साईबाबा औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत, कौशल्य विकास मंत्रालय आणि उदयोजकता महासंचालनालय , नवी दिल्ली डायरेक्टोरेट जनरल ट्रेनिंग यांचेमार्फत घेणेत आलेल्या अखिल भारतीय व्यवसाय परिक्षा जुलै - २०२६ मध्ये उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांचा दीक्षांत समारंभ दि.०९/१०/२०२६ रोजी श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर, भा.प्र.से. यांचे हस्ते सन्मानचिन्ह (ट्रॉफी) व NCVT प्रमाणपत्र देऊन संस्थेत सर्व प्रथम आलेला तसेच प्रत्येक व्यवसायातुन प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाने उत्तीर्ण झालेल्या यशस्वी प्रशिक्षणार्थ्यांचा सन्मान करणेत आला.
या कार्यक्रमप्रसंगी शासकीय औ.प्र.संस्थेचे प्राचार्य श्री एम.एस. चकोर व संस्थानचे प्रशासकीय अधिकारी श्री अतुल वाघ , श्री अविनाश कुलकर्णी हे उपस्थित होते , त्यांनी प्रशिक्षणार्थ्यांना मार्गदर्शन केले. श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडीलकर, (भा.प्र.से.) यांनी अगोदर संस्थेतील गुणवंत प्रशिक्षणार्थ्यांचे अभिनंदन केले. याप्रसंगी बोलतांना संस्थेतील अखिल भारतीय व्यवसाय परिक्षा जुलै - २०२६ मध्ये उत्तीर्ण झालेल्या प्रशिक्षणार्थ्यांपैकी ९० टक्के प्रशिक्षणार्थीची शिकाऊ उमेदवारीसाठी निवड झाली असून उर्वरित प्रशिक्षणार्थींना गुणवत्तेनुसार संस्थानमध्ये शिकाऊ उमेदवारी देणार असलेबाबत सांगितले तसेच परिसरातील रोजगाराच्या शोधात असलेल्या विद्यार्थ्यांसाठी संस्थेमध्ये अल्प मुदतीचे अभ्यासक्रम सुरु करणार असलेबाबत माहिती दिली. त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची असेल त्यांचेसाठी संस्थेत कमवा व शिका ही योजना अमलात येणार असलेबाबत त्यांनी पुढे सांगितले.
या कार्यक्रमात संस्थेचे प्राचार्य अभयकुमार दुनाखे यांनी प्रास्ताविक केले, कार्यक्रमाचे सुत्रसंचालन श्री विकास पाटील यांनी केले तसेच सुनिल तांबे, गटनिदेशक यांनी आभार मानले.
सदर कार्यक्रमास संस्थानचे कर्मचारी तसेच प्रशिक्षणार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.
(गोरक्ष गाडीलकर,भा.प्र.से.)
मुख्य कार्यकारी अधिकारी
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी



