श्री. साईनाथ रुग्णालयात मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराचे आयोजन
श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डीचे श्री साईनाथ रुग्णालय आणि डॉ. राम चिलगर यांचे गीव्ह मी फाउंडेशन, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत प्लास्टिक सर्जरी शिबिराचे आयोजन दि. ६ डिसेंबर २०२४ ते दि. ८ डिसेंबर २०२४ या दरम्यान श्री. साईनाथ रुग्णालयात (२०० रूम) करण्यात आले आहे. या शिबिरात जळीत रुग्णांचे चिकटलेले हात, चिकटलेले खांदे, फाटलेले ओठ, जन्मजात चिकटलेले बोटे, चिकटलेले मान व हात अशा प्रकारच्या प्लास्टिक सर्जरी मोफत करण्यात येणार आहे.
शिबिरापूर्व तपासणीसाठी श्री. साईनाथ रुग्णालयाच्या ओपीडी क्रमांक ०३ येथे संपर्क साधावा तसेच अधिक माहिती व नोंदणीसाठी ०२४२३-२५८५५५ या क्रमांकावर संपर्क साधावा. या शिबिरात सहभागी होणाऱ्या सर्व रुग्णांसाठी श्री. साईबाबा संस्थानमार्फत राहण्याची आणि दोन वेळच्या जेवणाची मोफत व्यवस्था करण्यात आली आहे.
जास्तीत जास्त गरजू रुग्णांनी या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डीचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर, भा.प्र.से यांनी केले आहे.