श्री साईबाबा सांस्कृतिक भवन उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न
शिर्डी – श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डी यांच्या शैक्षणिक संकुलातील श्री साईबाबा सांस्कृतिक भवन या भव्य वास्तूचे उद्घाटन संस्थानचे तदर्थ समितीच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजु शेंडे (सोनटक्के), यांच्या शुभहस्ते व श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर भा.प्र.से. यांच्या प्रमुख उपस्थित उत्साहात संपन्न झाला.
उद्घाटनप्रसंगी बोलताना संस्थानच्या अध्यक्षा श्रीमती शेंडे यांनी सांगितले की, “ग्रामीण भागातील सर्वात मोठे आणि अत्याधुनिक सुविधांनी सुसज्ज असे हे ऑडिटोरियम संस्थेच्या नावलौकिकात भर घालणारे आहे. या वास्तूमध्ये खरे कलाकार घडतील, जे भविष्य घडवून संस्थेचा गौरव वाढवतील.”
कार्यक्रमाला उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे, शिर्डीचे उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल भारती, मुख्य लेखाधिकारी मंगला वराडे, प्रशासकीय अधिकारी संदीपकुमार भोसले, प्रज्ञा महांडुळे, विश्वनाथ बजाज, कार्यकारी अभियंता भिकन दाभाडे, उपकार्यकारी अभियंता संजय जोरी यांच्यासह संस्थानचे विभाग प्रमुख, प्राचार्य, शिक्षक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “शैक्षणिक संकुलातील विद्यार्थी तालुका, जिल्हा, राज्य आणि राष्ट्रीय, पातळीवरील विविध स्पर्धांमध्ये यश संपादन करून संस्थेचे नाव उज्ज्वल करत आहेत, याचा आम्हाला अभिमान आहे.”
या वेळी इमारत बांधणारे न्याती कन्स्ट्रक्शन, फर्निचर तयार करणारे शानदार, आर्किटेक्ट डी. ओ. निकम तसेच संस्थानचे बांधकाम, विद्युत आणि मेकॅनिकल विभाग प्रमुखांचा सत्कार करण्यात आला.
संगीत मार्गदर्शक सुधांशु लोकेगावकर, प्राणेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी साई भजन आणि स्वागत गीत सादर करून कार्यक्रमाला सुरेल सुरुवात केली. तर संस्थान कर्मचारी भरत विसपुते ,अजिंक्य गायकवाड यांनी गीत सादर केली.
प्रास्ताविक उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी केले, तर प्राचार्य विकास शिवगजे यांनी आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र कोहोकडे यांनी केले.