शिर्डी :-
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने आयोजित केलेल्या श्री रामनवमी उत्सवाच्या मुख्य दिवशी राज्यातून व देशाच्या कानाकोप-यातून आलेल्या लाखो भाविकांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. तर मुंबईसह राज्याच्या विविध भागातून आलेल्या पालखीतील साईभक्तांच्या साईनामाच्या गजराने शिर्डी दुमदुमून गेली.
आज उत्सवाच्या मुख्य दिवशी पहाटे ०५.१५ वाजता श्रींची काकड आरती झाली.काकड आरतीनंतर श्री साईसच्चरित या पवित्र ग्रंथाच्या अखंड पारायणाची समाप्ती झाली. अखंड पारायण समाप्तीनंतर श्रींचे फोटो, पोथी व विणाची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीत संस्थानचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी पोथी, संस्थानचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी वीणा व मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व उप कार्यकारी अभियंता दिनकर देसाई यांनी फोटो घेवून सहभाग घेतला. यावेळी संरक्षण अधिकारी रोहीदास माळी, मंदिर प्रमुख रमेश चौधरी, प्र. जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, मंदिर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सकाळी ०६.२० वा. श्रींचे मंगलस्नान झाले. दर्शन व कावडी मिरवणूक झाली व सकाळी ०७.३० वाजता श्री रामनवमी उत्सवााच्या निमित्त अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा व त्यांची सुविद्य पत्नी सौ.मालती यार्लगड्डा यांनी श्रींची पाद्यपूजा केली. सकाळी ८.०० वाजता प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा, संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांचे हस्ते श्री साईबाबा समाधी शताब्दी स्तंभाच्या ध्वजाचे विधीवत पुजन करुन ध्वज बदलण्यात आला. सकाळी ८.३० वाजता द्वारकामाईतील बदलण्यात येणा-या गव्हाच्या पोत्याची श्री साईबाबा समाधी मंदिरात संस्थानचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा यांनी सपत्नीक, मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी सपत्नीक व उप मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी सपत्नीक यांचे हस्ते विधीवत पुजन करुन गव्हाचे पोते बदलण्यात आले यावेळी मंदिर प्रमुख रमेश चौधरी, प्र. जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, संरक्षण अधिकारी रोहीदास माळी आदी उपस्थित होते.
सकाळी १०.०० ते १२.०० वाजता मारुती मंदिराशेजारील श्री साईबाबा समाधी शताब्दी मंडपाच्या स्टेजवर ह.भ.प. विक्रम नांदेडकर, गोरटे यांचे श्रीराम जन्मोत्सव कीर्तन झाले. त्यानंतर संस्थानचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा व सौ. मालती यार्लगड्डा, मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे, प्र. जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, मंदीर पुजारी, शिर्डी ग्रामस्थ व साईभक्त यांच्या उपस्थितीत श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला. दुपारी १२.३० वा. श्रींची माध्यान्ह आरती झाली. दुपारी ०३.३० ते ०५.३० वा. यावेळेत डॉ. लता सुरेंद्र, मुंबई यांचा आयना, प्रभु रामाचा महाकाव्य प्रवास हा कार्यक्रम झाला. दुपारी ०४.०० वा. निशाणांची मिरवणूक तर सायं. ०५.०० वा. श्रींचे रथाची गावातून मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीत संस्थानचे अध्यक्ष, सदस्य, अधिकारी, कर्मचारी, साईभक्त, ग्रामस्थ आणि बँड पथके मोठ्या संख्येने सहभागी झाले. मिरवणूक परत आल्यानंतर सायं. ०६.३० वा. श्रींची धुपारती झाली. रात्रौ ०७.३० ते ०९.३० यावेळेत श्री. विजय साखरकर, साईसेवा नृत्योत्सव, मुंबई यांचा साईस्वर नृत्योत्सव कार्यक्रम झाला. रात्रौ १०.०० ते पहाटे ०५.०० यावेळेत समाधी मंदिरासमोरील स्टेजवर कलाकारांच्या हजेरीचा कार्यक्रम झाला. तसेच आज उत्सवाच्या मुख्य दिवशी श्रींचे समाधी मंदिर रात्रभर दर्शनाकरीता खुले असल्यामुळे लाखो भाविकांनी श्रींच्या समाधीच्या दर्शनाचा लाभ घेतला.
श्री रामनवमी उत्सवाचे औचित्यावर श्रीमती सुनिता पोद्दार यांनी श्री साईप्रसादालयास ३१ लाख रुपये किंमतीचे डिश वाशिंग मशिन देणगी स्वरुपात दिले. श्री साईप्रसादालयात डिश वाशिंग मशिनचे उदघाटन साईभक्त श्रीमती सुनिता पोद्दार व संस्थानचे अध्यक्ष तथा प्रधान जिल्हा न्यायाधीश सुधाकर यार्लगड्डा व सौ. मालती यार्लगड्डा यांचे हस्ते करण्यात आले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उप मुख्य कार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे, कार्यकारी अभियंता भिकन दाभाडे, मॅकेनिकल विभाग प्रमुख अतुल वाघ, श्री साई प्रसादालय विभाग प्रमुख विष्णु थोरात आदी उपस्थित होते.
उत्सवाच्या सांगता दिनी गुरुवार, दिनांक १८ एप्रिल रोजी पहाटे ०५.०५ वा. श्रींचे मंगलस्नान व दर्शन, सकाळी ०६.५० वा. श्रींची पाद्यपुजा, सकाळी ०७.०० वा. श्रींचे गुरुस्थान मंदिर येथे रुद्राभिषेक, सकाळी १०.०० ते १२.०० यावेळेत ह.भ.प. विक्रम नांदेडकर, गोरटे यांचे काल्याचे कीर्तन कार्यक्रम, दुपारी १२.१० वा. श्रींची माध्यान्ह आरती, दुपारी ०३.३० ते ०५.३० वा. यावेळेत डॉ. प्रसाद श्रीराम चौधरी, जालना यांचा अभंगवाणीचा कार्यक्रम व सायंकाळी ०६.३० वा. श्रींची धुपारती होईल. रात्रौ ०७.३० ते ०९.३० यावेळेत अलोक मिश्रा, साई आस ट्रस्ट, दिल्ली यांचा साई भजनसंध्या कार्यक्रम होणार आहे. रात्रौ ९.१५ वा. श्रींची नित्याची गुरुवारची पालखी मिरवणूक होईल. रात्रौ १०.०० वा. श्रींची शेजारती होईल.