Languages

   Download App

News

News

शिर्डी | जागतिक योग दिनानिमित्त श्री साईबाबा संस्थान व ग्रामस्थांच्या संयुक्त विद्यमाने विशेष योग साधना कार्यक्रम संपन्न

जागतिक योग दिनाचे औचित्य साधून, श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डी व शिर्डी ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने आज दिनांक २१ जून रोजी द्वारावती भक्तनिवास समोरील बागेत विशेष योग साधना कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमात विविध मान्यवरांच्या उपस्थितीत सामूहिक योगाभ्यास पार पडला.

या प्रसंगी श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांनी मार्गदर्शन करताना नमूद केले की, "निरोगी जीवनशैलीसाठी योग हे अत्यंत प्रभावी साधन असून, सद्यस्थितीत धकाधकीच्या जीवनात मानसिक व शारीरिक समतोल राखण्यासाठी योगाचे महत्त्व अधिकच वाढले आहे."

योग प्रशिक्षण सत्राचे नेतृत्व योगाचार्य डॉ. तुषार सिसोदिया व डॉ. नचिकेत वर्पे यांनी केले. त्यांनी उपस्थितांना विविध योगासने व प्राणायामाचे प्रात्यक्षिकांसह सविस्तर मार्गदर्शन केले. त्याचप्रमाणे प्रज्वल ढाकणे व त्यांच्या सहकाऱ्यांनी विविध योगासनांचे सादरीकरण करून उपस्थितांची योगप्रति जाणीव वाढवली.

कार्यक्रमाच्या शेवटी सर्व योग मार्गदर्शकांचा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गाडीलकर यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

या कार्यक्रमास संस्थानचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. भिमराज दराडे, प्रशासकीय अधिकारी श्री. संदीपकुमार भोसले, उपकार्यकारी अभियंते श्री. दिनकर देसाई व श्री. संजय जोरी, शैक्षणिक संकुलांचे प्राचार्य, शिक्षकवृंद, विद्यार्थी, संस्थानचे अधिकारी व कर्मचारी तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Recent News