Languages

  Download App

शिर्डीत ५ ते ७ एप्रिल दरम्यान ११४ वा श्रीरामनवमी उत्सव; विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन

शिर्डीत ५ ते ७ एप्रिल दरम्यान ११४ वा श्रीरामनवमी उत्सव;

शिर्डी-
श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था (शिर्डी) च्‍या वतीने  सालाबाद प्रमाणे यावर्षी शनिवार दिनांक ०५ एप्रिल ते सोमवार दिनांक ०७ एप्रिल २०२५ याकाळात ११४ वा श्रीरामनवमी उत्‍सव साजरा करण्‍यात येणार आहे. 
श्री साईबाबा संस्‍थाकडून १,७३,०३४ भक्‍तमंडळ सभासदांना श्रीरामनवमी उत्‍सवाच्‍या निमंत्रण पत्रिका पाठविण्‍यात आलेल्‍या असून ई-मेल द्वारे देखील आंमत्रित करण्‍यात आलेले आहे. श्रीरामनवमी उत्‍सवाची तयारी पुर्ण झाली असून मुंबई येथील व्‍दारकामाई मंडळाच्‍या वतीने ४ नंबर प्रवेशव्‍दाराचे आतील बाजुस श्री गजमुख गणपतीचा भव्‍य काल्‍पनिक देखावा तसेच मंदिर व संस्‍थान परिसरात व्‍दारकामाई मंडळ व मुंबई येथील साईभक्‍त कपील चढ्ढा यांचेवतीने आकर्षक विद्युत रोषणाई उभारण्‍यात येत आहे. सौदी अरेबिया येथील दानशुर साईभक्‍त‍ व्‍यंकटा सुब्रमण्‍यन यांच्‍या देणगीतून आकर्षक फुलांची सजावट करण्‍यात येणार आहे. तसेच उत्‍सवकाळात विविध धार्मिक व सांस्‍कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्‍यात आले असल्‍याची माहिती संस्‍थानचे मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.
श्री गाडीलकर म्‍हणाले, श्रीरामनवमी उत्‍सवाची सुरुवात १९११ मध्‍ये श्री साईबाबांचे अनुमतीने करण्‍यात आली. तेंव्‍हापासून प्रतीवर्षी हा उत्‍सव मोठ्या उत्‍साहाच्‍या वातावरणात शिर्डी येथे साजरा केला जातो. संस्‍थानकडे श्रीरामनवमी उत्‍सवा करीता वेगवगळया ठिकाणांहुन येणा-या ८७ पालख्‍यांनी नोंदणी केलेली आहे. उत्‍सवात होणारी संभाव्‍य गर्दी लक्षात घेवून दर्शनाची व्‍यवस्‍था सुखकर व्‍हावी, तसेच भाविकांचे उन्‍हापासुन संरक्षणाकरीता मंदिर व संस्‍थान परिसरात सुमारे ६७ हजार ४०९ चौ.फुट मंडप उभारण्‍यात आलेले आहेत. तसेच साईभक्‍तांच्‍या अतिरिक्‍त निवासव्‍यवस्‍थे करीता साईबाबा भक्‍तनिवासस्‍थान (५०० रुम), साईधर्मशाळा याठिकाणी सुमारे ३८ हजार ७९० चौ.फुट निवासी कापडी मंडप, बिछायत व कनातीसह मंडपाची उभारणी करण्‍यात आलेली असून यामध्‍ये विद्युत, पाणी पुरवठा, स्‍वच्‍छतागृह व सुरक्षा व्‍यवस्‍था ठेवण्‍यात आलेली आहे. याबरोबरच मुंबई व परिसरातून पालखी सोबत येणा-या पदयात्रींची निवा-याची सोय सुयोग्‍य होण्‍यासाठी संस्‍थानच्‍या वतीने मुंबई ते शिर्डी महामार्गावरील खर्डी, गोलभान, कसारा बायपास,  लतिफवाडी, घोटी, सिन्‍नर, खोपडी, पांगरी, वावी, पाथरे, दुशिंगवाडी, मलढोन व झगडे फाटा आदी ठिकाणी असलेले पालखी थांब्‍याच्‍या ठिकाणी सुमारे ०१ लाख १७ हजार चौ.फुट कापडी मंडप कनात व बिछायतीसह उभारण्‍यात आलेले असून यामध्‍ये विद्युत व पाणी पुरवठ्याची सोय करण्‍यात आलेली आहे. पालखीतील साईभक्‍तांसाठी यावर्षीपासून पालखी थांब्‍यांच्‍या ठिकाणी भजन व किर्तन कार्यक्रमाचे आयोजन करण्‍यात आलेले आहे. पालखीतील साईभक्‍तांच्‍या व्‍यवस्‍थेकरीता मोबाईल टॉयलेट व्‍हॅनची व्‍यवस्‍था तसेच साईबाबांच्‍या प्रचार प्रसाराकरीता पालखी थांब्‍यांच्‍या ठिकाणी एलईडी व्‍हॅनची व्‍यवस्‍था करणेत आली आहे.  पालखी पदयात्री यांचे सुलभ प्रवासाकरीता कोपरगांव येथील वाल्‍मीकराव कातकडे बंधु यांनी विनामुल्‍य १० पाण्‍याचे टॅंकर चालकासह दिलेले असून याकरीता संस्‍थानच्‍या वतीने इंधन खर्च व देखरेखीची व्‍यवस्‍था करण्‍यात आलेली आहे. तसेच पालख्‍या शिर्डी येथे आल्‍यानंतर पदयात्रींची साई धर्मशाळा येथे नाममात्र दरात निवासाची व्‍यवस्‍था करण्‍यात येणार आहे. सिन्‍नर ते शिर्डी या मार्गावर पदयात्रींना आवश्‍यकतेनूसार तातडीची वैद्यकीय सुविधा उपलब्‍ध व्‍हावी यासाठी श्री साईबाबा संस्‍थान रूग्‍णालयाच्‍या वतीने फिरते वैद्यकीय पथक तैनात करण्‍यात आले आहे. 
उत्‍सव काळात श्री साईप्रसादालयात अंदाजे २ लाखाहून अधिक साईभक्‍त प्रसाद भोजन घेतील असे नियोजन करणेत आलेले आहे.  तीन दिवस उत्‍सवात वेगवेगळे मिष्‍ठान्‍न प्रसाद भोजनात देणेत येणार आहे.  दर्शनरांगेत व परिसरात भक्‍तांना चहा, कॉफी व दुध सुलभतेने मिळावे यासाठी साई कॉम्‍प्‍लेक्‍स,  साईआश्रम, धर्मशाळा, भक्‍तनिवासस्‍थान (५०० रुम), व्‍दारावती भक्‍तनिवासस्‍थान तसेच साई उद्यान इमारत परिसर, नविन दर्शनरांग, शांतीनिवास इमारतीतील दर्शनरांगेत तळमाळा व पहिल्‍या माळ्यावर चहा व कॉफीची अतिरिक्‍त व्‍यवस्‍था करण्‍यात आली आहे. तसेच गुरुस्‍थान मंदिरासमोर दिक्षीत वाडा,  नविन दर्शनरांग, शांतीनिवास इमारत दर्शनरांग, मारुती मंदिराशेजारील श्री साईबाबा समाधी मंदिर शताब्‍दी मंडप, श्री साईआश्रम (१००० रुम) व श्री साईप्रसादालय आदी ठिकाणी प्रथमोपचार केंद्र सुरु राहणार असून या ठिकाणी तातडीच्‍या वैद्यकीय सेवेसाठी रुग्‍णवाहीका ही तैनात करण्‍यात आलेल्‍या आहेत. भाविकांना श्रींच्‍या दर्शनासाठी येणे-जाणेकरीता श्री साईआश्रम, श्री साईबाबा भक्‍तनिवासस्‍थान, श्री साई धर्मशाळा व श्री साईप्रसादालय आदि ठिकाणाहुन संस्‍थानच्‍या जादा बसेसची व्‍यवस्‍था करण्‍यात आलेली आहे. उत्‍सव कालावधीत भक्‍तांना प्रसाद लाडू पॅकेट सहजतेने उपलब्‍ध व्‍हावे यासाठी १८० क्विंटलचा बुंदी व लाडु प्रसाद तयार करण्‍यात येणार असुन नवीन दर्शनरांग, श्री साईनाथ मंगल कार्यालय,  श्री साईप्रसादालय, सेवाधाम इमारत व सर्व निवासस्‍थाने आदी ठिकाणी लाडू विक्री केंद्र उभारण्‍यात आलेले आहेत. तसेच आवश्‍यकता भासल्‍यास अतिरिक्‍त लाडू विक्री केंद्र उभारण्‍याचे नियोजन करण्‍यात आलेले आहे. तसेच मंदिर परिसर व शिर्डी परिसरात बंदोबस्‍त चोख ठेवण्‍यासाठी संस्‍थान सुरक्षा विभागाचे संरक्षण कर्मचारी, पोलिस अधिकारी व कर्मचारी, शिघ्र कृतीदल पथक, बॉम्‍ब शोधक पथक तैनात करण्‍यात आले आहे. याबरोबरच श्री साईबाबा संस्‍थान, पोलिस प्रशासन व शिर्डी नगरपंचायत यांचे संयुक्‍त अतिक्रमण व दलाल प्रतिबंधक पथक ही सज्‍ज ठेवण्‍यात आलेले आहेत.
उत्‍सव कालावधीतील विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमाची रुपरेषा पुढीलप्रमाणे आहे.  उत्‍सवाच्‍या प्रथम दिवशी शनिवार दिनांक ०५ एप्रिल रोजी पहाटे ०५.१५ वा. श्रींची काकड आरती, पहाटे ०५.४५ वाजता श्रींच्‍या पोथी व प्रतिमा मिरवणूक, ०६.०० वा. व्‍दारकामाई मंदिरामध्‍ये‍ श्री साईसच्चरित्र ग्रंथाचे अखंड पारायणास सुरवात, ०६.२० वा. श्रींचे मंगलस्‍नान व दर्शन, सकाळी ०७.०० वा. श्रींची पाद्यपुजा, सकाळी १०.०० ते १२.०० वा. पं. कृष्‍णेंद वाडीकर, श्री क्षेत्र नृसिंहवाडी यांचा राम रंगी रंगले हा कार्यक्रम तर दुपारी १२.३० वा. श्रींची माध्‍यान्‍ह आरती  होणार आहे.  दु. ०१.०० ते ०३.०० वा. अॅड. साई आशीष, दिल्‍ली यांचा साईभजन कार्यक्रम तर सायं.०४.०० ते ०६.०० यावेळेत ह.भ.प. विक्रम नांदेडकर, गोरटे यांचा कीर्तन कार्यक्रम तर सायंकाळी ०६.३० वा. श्रींची धुपारती होईल. रात्रौ ०७.०० ते ०९.३० यावेळेत स्‍वरश्री प्रतिष्‍ठाण, मुंबई ( दिव्‍यांग कलाकार )  यांचा आनंद यात्री हा कार्यक्रम असून रात्रौ ०९.१५ वा. श्रींच्‍या पालखीची गावातून मिरवणूक काढण्‍यात येईल. श्रींची शेजारती रात्रौ १०.३० वा. (पालखी मिरवणूक परत आल्‍यानंतर) होईल. यादिवशी अखंड पारायणासाठी व्‍दारकामाई मंदिर रात्रभर खुले राहणार आहे. 
उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी,रविवार दिनांक ०६ एप्रिल रोजी पहाटे ०५.१५ वा. श्रींची काकड आरती, पहाटे ०५.४५ वा. अखंड पारायणाची समाप्‍ती होवून श्रींचे पोथी व प्रतिमा मिरवणूक होईल. सकाळी ०६.२० वा. कावडी मिरवणूक, श्रींचे मंगलस्‍नान व दर्शन. सकाळी ०७.०० वा. श्रींची पाद्यपुजा, सकाळी १०.०० ते १२.०० यावेळेत ह.भ.प. विक्रम नांदेडकर, गोरटे यांचा श्रीरामजन्‍म कीर्तन कार्यक्रम तर दुपारी १२.३० वा. श्रींची माध्‍यान्‍ह आरती होणार आहे.  दुपारी ०१.०० ते ०३.०० वा. यावेळेत श्री. अलोक मिश्रा, साईआस फाऊंडेशन, दिल्‍ली  यांचा साईभजन कार्यक्रम, दुपारी ०३.३० ते ०५.३० वा. यावेळेत श्री. विजय गुजर, मुंबई याचा  साईभजन संध्‍या कार्यक्रम, दुपारी ०४.०० वा. निशाणाची मिरवणूक तर सायं. ०५.०० वा. श्रींचे रथाची गावातुन मिरवणूक होणार आहे. सायं. ०६.३० वा. श्रींची धुपारती(श्रींचे रथाची मिरवणूक परत आल्‍यानंतर) होईल. तसेच सायं. ०७.०० ते १०.०० यावेळेत श्री. मनहरजी उधास, मुंबई यांचा साईभजन संध्‍या कार्यक्रम होणार असून रात्रौ १०.०० ते पहाटे ०६.०० वाजेपर्यंत श्रींचे समोर इच्‍छुक कलाकारांचा हजेरी कार्यक्रम होईल. या दिवशी समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले राहील. त्‍यामुळे दिनांक ०६ एप्रिल रोजीची नित्‍याची शेजारती व दिनांक ०७ एप्रिल रोजीची पहाटेची काकड आरती होणार नाही. 
 उत्‍सवाच्‍या सांगता दिनी सोमवार, दिनांक ०७ एप्रिल रोजी पहाटे ०६.०० वा. श्रींचे मंगलस्‍नान व दर्शन, सकाळी ०६.५० वा. श्रींची पाद्यपुजा,  सकाळी ०७.०० वा. श्रींचे गुरुस्‍थान मंदिर येथे रुद्राभिषेक सकाळी १०.०० ते १२.०० यावेळेत ह.भ.प. विक्रम नांदेडकर, गोरटे यांचे काल्‍याचे कीर्तन  व दहीहंडीचा कार्यक्रम तर दुपारी १२.१० वा. श्रींची माध्‍यान्‍ह आरती होईल. दुपारी ०१.०० ते ०३.०० वा. यावेळेत  द गोल्‍डन व्‍हॉईस स्‍टुडीओज, मुंबई यांचा साईभजन संध्‍या कार्यक्रम, दुपारी ०३.३० ते ०५.३० वा. यावेळेत श्रीम. पुजा राठोर, जयपुर यांचा साईभजन संध्‍या कार्यक्रम होणार असून सायंकाळी ०६.३० वा. श्रींची धुपारती होईल.  सायं. ०७.०० ते ०९.३० वा. यावेळेत  मिराज इव्‍हेंटस्, मुंबई यांचा साई भजनसंध्‍या कार्यक्रम होईल तर रात्रौ १०.०० वा. श्रींची शेजारती होईल. किर्तन व  निमंत्रित कलाकारांचे कार्यक्रम मारुती मंदिराशेजारील श्री साईबाबा समाधी शताब्‍दी मं‍डपाच्‍या स्‍टेजवर होणार असल्‍याचे ही श्री.गाडीलकर यांनी सांगितले.
उत्‍सवाचे निमित्‍ताने व्‍दारकामाई मंदिरात प्रथम दिवशी होणा-या श्रीसाईसच्‍चरित्राच्‍या अखंड पारायणामध्‍ये जे साईभक्‍त भाग घेवू इच्‍छीतात अशा साईभक्‍तांनी आपली नावे शुक्रवार दिनांक ०४ एप्रिल रोजी दुपारी ०१.०० ते सायंकाळी ०५.२० वा. यावेळेत देणगी काऊंटर नंबर १ येथे नोंदवावीत. त्‍याच दिवशी सायंकाळी ०५.३० वाजता समाधी मंदिरातील मुख दर्शन स्‍टेजवर चिठ्ठया काढुन पारायण करणा-यांची नावे निवडण्‍यात येतील. तसेच उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी रवि‍वार दिनांक ०६ एप्रिल रोजी रात्रौ १०.०० ते ०६.०० वा.  यावेळेत होणा-या कलाकारांच्‍या हजेरी कार्यक्रमासाठी इच्‍छुक कलाकारांनी आपली नावे समाधी मंदिराशेजारील अनाऊंसमेंट रुममध्‍ये त्‍याच दिवशी आगाऊ नोंदवावीत, असे सांगुन सर्व साईभक्‍तांनी या उत्‍सवास उपस्थित राहून उत्‍सवाची शोभा वाढवावी, असे आवाहन श्री. गाडीलकर यांनी केले आहे.
या वर्षीचा श्री रामनवमी उत्‍सव यशस्‍वीरित्‍या पार पाडण्‍यासाठी संस्‍थानचे तदर्थ समितीच्‍या अध्‍यक्षा तथा प्रमुख जिल्‍हा व सत्र न्‍यायाधीश अंजु शेंडे (सोनटक्‍के), समिती सदस्‍य तथा जिल्‍हाधिकारी डॉ.पंकज आशिया,भा.प्र.से, मुख्‍य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर व उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांच्‍या मार्गदर्शनाखाली संस्‍थानचे सर्व प्रशासकीय अधिकारी, संरक्षण अधिकारी, सर्व विभागांचे विभाग प्रमुख व सर्व कर्मचारी प्रयत्‍नशिल आहे.

Undefined
शिर्डीत ५ ते ७ एप्रिल दरम्यान ११४ वा श्रीरामनवमी उत्सव; विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन
Tuesday, April 1, 2025 - 18:15