श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था शिर्डीकडून सुरु केलेल्या साईभक्त अपघात विमा योजनेअंतर्गत साईभक्ताचे वारसास मिळाली नुकसान भरपाई
श्री साईबाबांच्या दर्शनासाठी जे भाविक दर्शन/आरती/रुम/अभिषेक/सत्यनारायण या सेवांचे ऑनलाईन बुकिंग करुन येतात, तसेच पालखीव्दारे आगाऊ नोंदणी करुन पायी येतात, अशा भाविकांकरीता १ वर्षासाठी श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीमार्फत मे. नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि., कोपरगांव यांचेव्दारा अपघाती विमा उतरविलेला आहे. या विमा योजनेअंतर्गत, हैद्राबाद येथील साईभक्त (कै.) माधुरी गडडे यांच्या वारसांना मे. नॅशनल इंन्शुरन्स कंपनी लि., कोपरगांव यांचेकडून ५ लाख रुपयांची रक्कम विमा दावा म्हणून मंजूर करण्यात आला आहे.
हैदराबादहून शिर्डी येथे श्रींचे दर्शनासाठी येत असतांना श्रीमती माधुरी गडडे यांचा अपघातात दि.११ मे २०२५ रोजी दुर्दैवी मृत्यू झाला होता. कै. माधुरी गडडे यांनी संस्थानचे ऑनलाईन काकड आरती पासचे आगाऊ बुकिंग केले होते. याबाबतची उचित कागदपत्रे त्यांचे वारसांनी या दुःखद घटनेनंतर श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी यांचेकडे सादर केली होती. श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीचे लेखाशाखेकडून वरील विमा योजनेअंतर्गत त्यांच्या वारसांना मदत मिळवून देण्याची प्रक्रिया तात्काळ सुरू केली. आवश्यक सर्व कागदपत्रे आणि औपचारिकता पूर्ण झाल्यानंतर, मे. नॅशनल इन्शुरन्स कंपनी लि., कोपरगांव यांनी सदर विमा क्लेम मंजूर करुन विमा क्लेमची रक्कम रु.५लाख मात्र संस्थानकडे जमा केली आहे. संस्थानमार्फत ५ लाख रुपयांचा विमा क्लेमची रक्कम RTGS व्दारे त्यांचे वारस श्री. आकाश गडडे, हैद्राबाद यांना दि.१५, सप्टेबर, २०२५ रोजी वितरीत करण्यात आली. या मदतीबद्दल वारसांनी श्री साईबाबा संस्थानचे आभार मानले आहेत.
श्रींचे दर्शनासाठी विविध ठिकाणाहुन पालखी घेऊन पायी तसेच विविध खाजगी अथवा सार्वजनीक वाहनांव्दारे शिर्डीत येणा-या श्री साईभक्तांचा शिर्डी येथे दर्शनासाठी येत असतांना दुर्दैवी अपघात झाल्यास त्यांचे कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळतो. यामध्ये साईभक्तांचे जीविताची/शारीरिक हानी होते. अशा अडचणी प्रसंगी साईभक्तांना काही प्रमाणात संस्थानकडून आर्थिक मदत व्हावी म्हणून विमा कवच उपलब्ध करुन देवून श्री साईबाबा संस्थानने सामाजिक जबाबदारी जपलेली आहे.