Languages

  Download App

News

News

शिर्डी येथे परकीय चलनाच्या माध्यमातून देणगी स्वीकृतीस मान्यता
श्री साईबाबा संस्थानमध्ये दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना बाबांच्या चरणी देणगी अर्पण करण्याची सुविधा आता परकीय चलनामध्ये देखील उपलब्ध झाली आहे. भारत सरकारच्या केंद्रीय गृह मंत्रालयाने दिलेल्या परवानगीमुळे भाविकांना परकीय चलनातील नोटा, चेक तसेच तत्सम माध्यमांद्वारे देणगी अर्पण करता येणार आहे.
श्री साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून मोठ्या प्रमाणात भाविक शिर्डी येथे येतात. भाविकांना देणगी अर्पण करण्यासाठी रोख, ऑनलाईन, युपीआय, मनीऑर्डर, चेक-डीडी यासह विविध पर्याय उपलब्ध आहेत. यामध्ये आता परकीय चलनामधून देणगी स्वीकृतीचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.
श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, भा.प्र.से. यांनी माहिती देताना सांगितले की, केंद्रीय गृह मंत्रालयाच्या परवानगीमुळे संस्थानला परकीय चलनातील देणगी स्वीकृतीचे रजिस्ट्रेशन नूतनीकरण करून मिळाले आहे. त्यामुळे देश-विदेशातील भाविकांना अधिक सुलभतेने देणगी अर्पण करण्याची संधी मिळणार आहे.
ज्या भाविकांना परकीय चलन अथवा चेकद्वारे देणगी अर्पण करायची आहे, त्यांनी दक्षिणापेटीत, श्रीसाईबाबा मंदिर परिसरातील देणगी काउंटरवर किंवा ऑनलाईन माध्यमातून देणगी अर्पण करता येईल, असेही गाडीलकर यांनी सांगितले.

Recent News