शिर्डी -
मॉरिशस मध्ये ५ ते ६ श्री साईबाबांचे छोटे मंदिरे असून गंगालेख येथे भव्य मंदिर उभारणार असल्याची माहिती मॉरिशसचे भु-परिवहन व लाईट रेल्वे मंत्री श्री.एलन गेणू यांनी दिली.
श्री.गेणू हे श्री साईबाबांच्या समाधीच्या दर्शनाकरीता शिर्डी येथे आले होते. यावेळी संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिपक मुगळीकर यांनी त्यांचे स्वागत करुन सत्कार केला. यावेळी संस्थानचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, मॉरिसशचे श्री.जी.ए.गणू, स्टर्लिंग प्रकाशनचे अध्यक्ष श्री.सुरेंद्र के.घई, राकेश जुनेजा आदी उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना श्री.गेणू म्हणाले, मॉरिशस या देशात सुमारे ६० टक्के हिंदु लोक वास्तव्य करतात. तसेच मॉरिशसमध्ये सुमारे ५ ते ६ श्री साईबाबांची छोटी- छोटी मंदिरे असून या ठिकाणी भाविक बाबांच्या दर्शनाकरीता गर्दी करतात. यामुळे आम्ही गंगा लेख येथे श्री साईबाबांचे भव्य मंदिर बांधण्याचे ठरवले असून यासाठी जागाही निश्चित करण्यात आली असल्याचे सांगून आज श्री साईबाबांच्या दर्शन घेवून अतिशय आनंद झाला असल्याचे ही श्री.गेणू यांनी सांगितले.