शिर्डी –
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने नाताळ सुट्टी, चालु वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागता निमित्त शिर्डी महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून श्री साईबाबांच्या दर्शनासाठी शिर्डीत होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेवून समाधी मंदिर मंगळवार दिनांक ३१ डिसेंबर २०२४ रोजी दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवण्यात येणार असल्याची माहिती संस्थानचे प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांनी दिली.
श्री.कोळेकर म्हणाले, दरवर्षी नाताळ सुट्टी, चालु वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागता निमित्त श्रींच्या दर्शनासाठी शिर्डीत मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. येणा-या सर्व भाविकांना श्रींच्या समाधीच्या दर्शनाचा लाभ मिळावा व होणा-या गर्दीचे नियोजन योग्य रितीने व्हावे या उद्देशाने मंगळवार दिनांक ३१ डिसेंबर २०२४ रोजी श्रींचे समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुले ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे दिनांक ३१ डिसेंबर रोजीची शेजारती व दिनांक ०१ जानेवारी २०२५ रोजीची पहाटेची काकड आरती होणार नाही.
तसेच नाताळ व नवर्षाच्या सुट्टीच्या गर्दीमुळे बुधवार दिनांक २५ डिसेंबर ते बुधवार दिनांक ०१ जानेवारी २०२५ रोजी असे ०७ दिवस वाहन पूजा बंद राहतील. परंतु नाताळ सुट्टीचे कालावधीत श्री साईसत्यव्रत पूजा, अभिषेक पूजा सुरु राहील याची सर्व साईभक्तांनी नोंद घ्यावी, असे सांगुन मंदिर व परिसरात फटाके व वाद्य वाजविण्यास मनाई करण्यात आली असुन सुरक्षिततेच्या दृष्टीने शिस्तीचे पालन करण्याचे आवाहनही श्री.कोळेकर यांनी केले.
हा महोत्सव यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी संस्थानचे प्र.मुख्य कार्यकारी अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थानचे प्र.उपमुख्य कार्यकारी अधिकारी व सर्व प्रशासकीय अधिकारी तसेच सर्व विभागांचे विभाग प्रमुख व सर्व कर्मचारी प्रयत्नशिल आहे.