शिर्डी,
वैद्यकशास्त्रातील अत्यंत दुर्मिळ ठरावा असा अद्भुत योगायोग नुकताच श्री साईबाबा संस्थान संचालित श्री साईबाबा सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल, शिर्डी येथे घडला आहे. बुलडाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील नागझरी येथील ४२ वर्षीय सख्ख्या जुळ्या बहिणी—सुनिता साबे आणि दुर्गा उगले—या दोघींना मेंदूमध्ये एकसारखीच गाठ (Brain Tumor) असल्याचे निदान झाले. आश्चर्याची बाब म्हणजे या दोन्ही बहिणींच्या गाठीचा आकार, जागा, बाजू आणि स्वरूप (Histopathology) अगदी एकसारखेच होते.
श्री साईबाबा सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे न्युरो सर्जन डॉ. मुकुंद चौधरी यांनी आधुनिक तंत्रज्ञान व न्युरो मायक्रोस्कोपच्या साहाय्याने या दोन्ही बहिणींच्या मेंदूतील गाठींच्या शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या केल्या असून दोन्ही रुग्ण सध्या पूर्णपणे स्वस्थ आहेत.
दुर्गा उगले यांना दीर्घकाळ डोकेदुखीचा त्रास असल्यामुळे त्यांनी आठ महिन्यांपूर्वी डॉ. चौधरी यांच्याकडे तपासणी केली. MRI मध्ये डाव्या बाजूला मेंदूमध्ये साधारण ५×५ से.मी. आकाराची गाठ (Left Frontal SOL) आढळून आली. त्यांच्यावर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. पुढील तपासणीच्या वेळी त्यांची जुळी बहिण सुनिता साबे यांनीही डोकेदुखीची तक्रार मांडली. MRI तपासणीत त्यांच्या मेंदूतही तंतोतंत समान ठिकाणी व समान आकाराची गाठ आढळल्याने वैद्यकीय पथक अचंबित झाले.
दोन्ही बहिणींच्या गाठीचे तुकडे सूक्ष्मदर्शकाखाली तपासल्यावर त्या पूर्णपणे समान स्वरूपाच्या असल्याचे स्पष्ट झाले. डॉ. मुकुंद चौधरी यांनी सांगितले की, “जुळ्या बहिणींमध्ये एकसारखा आजार दिसणे सामान्य असले, तरी एकाच जागी, एकाच बाजूस, अगदी सारखा आकार आणि स्वरूप असणे, तसेच एकाच न्युरो सर्जनकडून यशस्वी शस्त्रक्रिया होणे हे अतिशय दुर्मिळ आहे.”
या दोन्ही शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजने अंतर्गत पूर्णपणे मोफत पार पडल्या. या यशस्वी उपचारासाठी न्युरो सर्जन डॉ. मुकुंद चौधरी, भुलतज्ज्ञ डॉ. संतोष सुरवसे, डॉ. निहार जोशी तसेच संपूर्ण न्युरो ओटी टीम यांचे विशेष योगदान राहिले. रुग्ण व त्यांच्या कुटुंबियांनी श्री साईबाबा संस्थानचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. गोरक्ष गाडीलकर भा.प्र.से., उपमुख्य अधिकारी श्री. भिमराज दराडे, वैद्यकीय संचालक लेफ्ट. कर्नल डॉ. शैलेश ओक, प्र.उप वैद्यकीय संचालक डॉ. प्रीतम वडगावे यांनी या यशस्वी कार्याबद्दल संपूर्ण वैद्यकीय पथकाचे अभिनंदन केले.