श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने मंदिर परिसरातील साई सत्यव्रत हॉलचे पहिल्या मजल्यावर उभारण्यात आलेले ध्यानमंदिर गुरूवार दिनांक १२ सप्टेंबर पासुन साईभक्तांकरिता खुले करण्यात आले असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री दिपक मुगळीकर यांनी दिली.
श्री मुगळीकर यांच्या हस्ते या ध्यानमंदिराची आज विधीवत पुजा करण्यात आली. या प्रसंगी मुख्यलेखाधिकारी बाबासाहेब घोरपडे, प्रशासकीय अधिकारी सर्वश्री डॉ.आकाश किसवे, सुर्यभान गमे, अशोक औटी, उप कार्यकारी अभियंता रघुनाथ आहेर, विविध विभागांचे विभाग प्रमुख, कर्मचारी उपस्थित होते.
श्री.मुगळीकर म्हणाले, साईभक्तांकडून अनेक दिवसांपासुन ध्यानकेंद्र उभारणीची मागणी होत होती. त्यानुसार श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्थेच्या वतीन समाधी मंदीर परिसरातील साई सत्यव्रत हॉलचे पहिल्या मजल्यावर सुमारे ४० लाख रुपये खर्च करुन २७०० चौ. फुट बांधकाम क्षेत्रफळ असलेले ध्यान मंदिर उभारण्यात आलेले आहे. या ध्यानमंदिरात सकाळी ९.०० ते रात्रौ ९.०० यावेळेत प्रत्येक भाविकाला २० मिनिटे ध्यानाकरिता बसता येइल. हे ध्यानकेंद्र साऊंड प्रुप व वातानुकुलित असुन जास्तीत जास्त साईभक्तांनी या ध्यान मंदिराचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री.मुगळीकर यांनी केले आहे.