श्री साईबाबांच्या “श्रद्धा आणि सबुरी” यासह अन्नदान,ज्ञानदान, दवादान या सारख्या शिकवणुकीचा प्रसार डिजिटल माध्यमांतून जगभर पोहोचवण्याच्या हेतूने श्री साईबाबा संस्थानच्या वतीने व शिर्डी ग्रामस्थ यांच्या सहकार्याने आयोजित केलेल्या “श्री साई डिजिटल इन्फ्लुएन्सर संमेलनाला” देश-विदेशातून अभूतपूर्व प्रतिसाद लाभला आहे. या उपक्रमासाठी २५० हून अधिक सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्सनी नोंदणी केली असून त्यात महाराष्ट्रासह दिल्ली, हरियाणा, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, आंध्रप्रदेश, तेलंगणा, राजस्थान, ओरिसा, काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंतच्या इन्फ्लुएंसर यांचा लक्षणीय सहभाग लाभत आहे. यासोबतच अमेरिका व इतर देशांतील काही भक्त इन्फ्लुएन्सर्सनी देखील सहभागी होण्याची इच्छा दर्शवली आहे.
विशेषतः शिर्डी, राहाता, कोपरगाव, पुणे, नाशिक या भागांतील स्थानिक डिजिटल क्रिएटर्स यांचा उत्स्फूर्त सहभाग, बाबांच्या सेवेसाठी असलेली नाळ अधिक दृढ करतो. या उपक्रमातून श्री साईबाबांचे विचार, संस्थानचे सेवाकार्य आणि शिर्डीचे सांस्कृतिक व आध्यात्मिक महत्त्व लाखो डिजिटल युजर्सपर्यंत पोहोचवण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे.
“साईबाबांच्या शिकवणुकीचा जागतिक स्तरावर प्रसार करण्यासाठी नव्या पिढीतील डिजिटल दूतांची साथ मिळणे ही अत्यंत आनंददायक गोष्ट आहे. संमेलनात सहभागी होण्यासाठी अजूनही 8 ऑगस्ट 2025 पर्यंत www.sai.org.in या संकेत स्थळावर नाव नोंदवता येणार असून श्रद्धा आणि सबुरीचा संदेश डिजिटल माध्यमांतून पोहोचवण्याचे हे एक प्रभावी पाऊल ठरणार आहे.