मोफत जयपूर फूट वाटप शिबिराची यशस्वी सांगता..
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डी, श्री भगवान महावीर विकलांग सहाय्यता समिती (मुंबई), जयपूर क्रिस्ट वेंचर्स लिमिटेड तसेच ईव्ही फाउंडेशन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत कृत्रिम पायरोपण (जयपूर फूट) व गरजू दिव्यांगांसाठी साहित्य वाटप शिबिराचे आयोजन दिनांक १९ ते २३ जानेवारी २०२६ या कालावधीत श्री साईनाथ रुग्णालय (२०० रूम) येथे करण्यात आले होते.
दिनांक २३ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ४.०० वाजता दिव्यांग व्यक्तींच्या हस्ते श्री साईबाबांच्या मूर्तीचे पूजन व आरती करून शिबिराची सांगता करण्यात आली. हा कार्यक्रम श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. गोरक्ष गाडीलकर (भा.प्र.से.) यांच्या अध्यक्षतेखाली तसेच श्री भगवान महावीर विकलांग सहाय्यता समिती (मुंबई – जयपूर) चे मा. नारायण व्यास यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.या शिबिरासाठी एकूण ७९० दिव्यांग बांधवांची नोंदणी झाली होती त्यापैकी
७६९ गरजू दिव्यांगांना विविध सहाय्यक साहित्य व जयपूर फूटचे वाटप करण्यात आले. यामध्ये
कृत्रिम पाय (Limbs) – २७०, कॅलिपर – ४७, व्हीलचेअर – ५०, तीन चाकी सायकल – ६३, इलेक्ट्रिक सायकल – ५, क्रच – ६१, वॉकर – ७९, एल्बो – २०, ट्रायपॉड – २०, काठी – १०४ तसेच कानाची मशीन – ५० यांचा समावेश होता. साहित्य प्राप्त केल्यानंतर दिव्यांग बांधवांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद अवर्णनीय होता.
मुख्य कार्यकारी अधिकारी मा. गोरक्ष गाडीलकर यांनी साहित्य व सायकल वाटपानंतर प्रत्यक्ष दिव्यांग बांधवांच्या सायकलींच्या मागे चालत त्यांना मार्गदर्शन व प्रोत्साहन दिले. यावेळी मा. नारायण व्यास यांनी शिर्डी येथे जयपूर फूट शिबिरासाठी मिळालेली संधी ही श्री साईबाबांचा आशीर्वाद असल्याची भावना व्यक्त केली.
शिबिरादरम्यान अहोरात्र परिश्रम करणाऱ्या श्री भगवान महावीर विकलांग सहाय्यता समितीच्या कर्मचाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. विविध मान्यवरांनी आपल्या मनोगतातून दिव्यांगांच्या सामाजिक पुनर्वसनाबाबत सकारात्मक संदेश दिला.
मुख्य कार्यकारी अधिकारी मा. गोरक्ष गाडीलकर यांनी आपल्या मनोगतात दिव्यांग बांधवांनी कोणताही न्यूनगंड न बाळगता समाजाच्या मुख्य प्रवाहात सहभागी व्हावे, समाज त्यांच्या कार्याची नक्कीच दखल घेईल, असे आवाहन करून श्री भगवान महावीर विकलांग सहाय्यता समिती (मुंबई – जयपूर) तसेच सर्व सहकार्य करणाऱ्या संस्थांचे आभार मानले.
या प्रसंगी श्री भगवान महावीर विकलांग सहाय्यता समितीचे मा. नारायणजी व्यास, श्री साईबाबा संस्थान रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक लेफ्ट. कर्नल डॉ. शैलेश ओक, उप वैद्यकीय संचालक डॉ. प्रितम वडगावे, प्र. वैद्यकीय अधीक्षक डॉ. मैथिली पितांबरे, प्र. अधिसेविका नजमा सय्यद, जनसंपर्क अधिकारी सुरेश टोलमारे,माहिती तंत्रज्ञान विभाग प्रमुख अनिल शिंदे यांच्यासह रुग्णालयातील अधिकारी व कर्मचारी तसेच महाराष्ट्रभरातून आलेले दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

