श्री साईबाबांच्या दर्शनासाठी देश-विदेशातून लाखो साईभक्त शिर्डीस येत असतात. अनेक भाविक मोठ्या श्रद्धेने श्री साईबाबांच्या चरणी विविध प्रकारचे दान अर्पण करत असतात. देणगीदार साईभक्तांच्या सेवा-सुविधांमध्ये वाढ करण्यासाठी सुधारित देणगी धोरणास नुकतीच मा. तदर्थ समितीची मान्यता मिळाली असल्याची माहिती श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्ष गाडिलकर यांनी दिली.
या निर्णयानुसार श्री साईबाबा संस्थान मार्फत साजरे होणारे प्रमुख चार उत्सव सोडून देणगीदार साईभक्तांना त्यांच्या देणगीच्या श्रेणीनुसार विविध प्रकारच्या सेवा-सुविधा — विशेषतः दर्शन-आरती सुविधा, बहुमान म्हणून शाल व फोटो, साई चरित्र, उदी- लाडू प्रसाद, भोजन पास इत्यादी दिल्या जाणार आहेत. या धोरणामुळे साईभक्तांना अधिक चांगल्या प्रकारे सुविधा देण्याचा संस्थानचा प्रयत्न आहे.
सुधारीत सेवा-सुविधांची माहिती खालीलप्रमाणे
१) रुपये १०,०००/- ते रु.२४,९९९/- पर्यंतचे दान-
देणगीदार साईभक्तास एका वेळेस कुटुंबातील ५ सदस्यांसाठी आरती पास दिला जाईल तसेच ५ उदी प्रसाद पॅकेट्स, १ लाडु प्रसाद पॅकेट दिले जातील.
२) रुपये २५,०००/- ते रु.५०,०००/- पर्यंतचे दान-
देणगीदार साईभक्तास दान करते वेळी दोन वेळेस कुटुंबातील ५ सदस्यांसाठी आरती / दर्शन पास दिला जाईल. तसेच, एक 3D पॉकेट फोटो, ५ उदी प्रसाद पॅकेट्स, १ साई सतचरित्र पुस्तक, २ लाडु प्रसाद पॅकेट्स दिले जातील.
३) रुपये ५०,००१/- ते रु.९९,९९९/- पर्यंतचे दान -
देणगीदार साईभक्तास दान करते वेळी कुटुंबातील ५ सदस्यांसाठी दोन VVIP आरती पास दिले जातील. त्याचबरोबर एक 3D पॉकेट फोटो, ५ उदी प्रसाद पॅकेट्स, १ साई सतचरित्र पुस्तक, २ लाडु प्रसाद पॅकेट्स दिले जातील.
४) रुपये १ लाख ते रु.९,९९,९९९/- पर्यंतचे दान-
देणगीदार साईभक्तांस त्यांनी दान केलेल्या वर्षामध्ये २ VVIP आरती पास मिळतील तसेच नंतरच्या वर्षामध्ये त्यांनी केलेल्या दानाप्रमाणे प्रति वर्ष १ VVIP आरती पास मिळेल. (उदाहरणार्थ, पाच लाख रुपयांच्या दानासाठी, पहिल्या वर्षी २ VVIP पास मिळतील नंतरच्या चार वर्षासाठी प्रत्येक वर्षी १ VVIP पास मिळेल). त्यांना गेट नं. ६ किंवा त्या वेळी कार्यरत असलेल्या सशुल्क दर्शन रांगेतून कुटुंबाच्या ५ सदस्यांसाठी तहहयात वर्षातुन १ वेळेस मोफत दर्शन सुविधा दिली जाईल तसेच, साईभक्तास देणगी दिल्यानंतर एक वेळेस बहुमान म्हणुन, १ सन्मान शॉल, १ 3D डेस्क नोट होल्डर / 3D I शेप फोटो, १ 3D पॉकेट फोटो, अभिषेक / सत्यनारायण पूजेचे कूपन, ५ उदी प्रसाद पॅकेट्स, १ साई सतचरित्र पुस्तक, ३ लाडू प्रसाद पॅकेट्स आणि कुटुंबातील ५ सदस्यांसाठी मोफत VIP प्रसाद भोजन पास दिले जातील.
५ ) रुपये १० लाख ते ५० लाख पर्यंत दान-
देणगीदार साईभक्तास त्यांनी देणगी दिलेल्या प्रमाणात प्रत्येक वर्षी २ VVIP आरती पास मिळतील, (उदाहरणार्थ, ३० लाख रुपयांच्या दानासाठी, ३० वर्षांसाठी प्रति वर्ष २ VVIP पास मिळतील).
देणगीदार साईभक्ताचे कुटुंबातील ५ सदस्यांना तहहयात वर्षातून एक वेळेस मोफत प्रोटोकॉल दर्शन दिले जाईल.
देणगीदार साईभक्तास वर्षात एक वेळेस श्री साईबाबांना वस्त्र परिधान करण्यासाठी वस्त्र देण्याची संधी दिली जाईल. (उदा. प्रत्येक रु.१० लाख दानासाठी एकवेळेस वस्त्र परिधान करण्यासाठी वस्त्र देण्याची संधी मिळेल (उदाहरणार्थ, ३० लाख रुपयांच्या दानासाठी देणगीदारास ३ वर्षे वस्त्र देण्याची संधी मिळेल).
देणगीदार साईभक्तास दान करतेवळी एक वेळेस श्री साईबाबांना परिधान केलेले वस्त्र भेट म्हणून दिले जाईल.
देणगीदार साईभक्तांस दान करतेवेळी बहुमान म्हणून , १ सन्मान शॉल, १ श्री साईंची मूर्ती, 3D डेस्क नोट होल्डर / 3D I शेप फोटो, 3D पॉकेट फोटो, अभिषेक / सत्यनारायण पूजेचे कूपन, ५ उदी पॅकेट्स, १ साई सतचरित्र पुस्तक, ५ लाडू प्रसाद पॅकेट्स, कुटुंबातील ५ सदस्यांसाठी मोफत VIP प्रसाद भोजन पास मिळेल.
६) रुपये ५० लाख आणि त्याहून अधिकचे दान-
देणगीदार साईभक्तास तहहयात ५ सदस्यांच्या कुटुंबासाठी प्रति वर्ष ३ VVIP आरती पास मिळतील.
देणगीदार साईभक्तास श्री साईबाबांना परिधान करण्यासाठी वस्त्र देण्याची संधी दिली जाईल, (उदा. प्रत्येक रु.१० लाखच्या दानासाठी एक वस्त्र देण्याची संधी मिळेल ) ही वस्त्र देणगीदार साईभक्त आयुष्यभरात कधीही दान करू शकतात. त्याकरिता १ महिना पुर्वी कळविणे बधंनकारक राहील.
देणगीदार साईभक्तांस दान करतेवेळी श्री साईबाबांना परिधान केलेले वस्त्र (१ सेट)भेट म्हणून दिले जाईल.
देणगीदार साईभक्तासह कुटूबांतील ५ सदस्यांना प्रत्येक वर्षी २ प्रोटोकॉल VVIP दर्शन पास मिळतील, ही सुविधा तहहयात लागू राहील.
देणगीदार साईभक्तास बहुमान म्हणून, १ सन्मान शॉल, १ श्री साईंची मूर्ती, 3D डेस्क नोट होल्डर / 3D I शेप फोटो, 3D पॉकेट फोटो, अभिषेक / सत्यनारायण पूजेचे कूपन, ५ उदी पॅकेट्स, १ साई सतचरित्र पुस्तक, ५ लाडु प्रसाद पॅकेट्स, देणगीदार साईभक्ताच्या कुटुंबातील ५ सदस्यांना मोफत VIP प्रसाद भोजन पास मिळेल.