प्रेस नोट-
श्री साईबाबा संस्थानमार्फत ११ वी आणि १२ वी सायन्स शाखेतील विद्यार्थ्यांना होणार एमएचटी-सीईटी कोचिंग सुविधा उपलब्ध
शिर्डी, दिनांक १६-
श्री साईबाबा संस्थान ट्रस्ट, शिर्डी हे केवळ अध्यात्मिकच नव्हे तर सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातही सक्रिय योगदान देत आहे. संस्थानच्या शैक्षणिक संकुलातील तसेच इतर इच्छुक विद्यार्थ्यांना भविष्यातील स्पर्धात्मक प्रवेश परीक्षांसाठी सक्षम बनविण्यासाठी, संस्थानतर्फे एमएचटी-सीईटी परीक्षेसाठी स्मार्ट डिजिटल लर्निंग क्लास व कोचिंग सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे,अशी माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी दिली.
यासाठी राष्ट्रीय स्तरावर नावाजलेल्या आणि अनुभवी संस्था निवडण्याची प्रक्रिया संस्थानने सुरू केली आहे. ही संस्था किमान १० वर्षांचा अनुभव असलेली असावी तसेच त्यांच्या स्टाफमध्ये IITians/NITians यांचा समावेश असणे आवश्यक आहे. गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी ही प्राथमिक अट ठेवण्यात आली आहे, जेणेकरून विद्यार्थ्यांना दर्जेदार मार्गदर्शन मिळू शकेल.
विशेष म्हणजे, संस्थानच्या शैक्षणिक संकुलातील १०वी इयत्तेत ९० टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना एमएचटी-सीईटी कोचिंग क्लाससाठी पूर्णतः मोफत प्रवेश दिला जाणार आहे. यामुळे होतकरू आणि बुद्धिमान विद्यार्थ्यांना त्यांच्या आर्थिक परिस्थितीची अडचण न येता उच्च शिक्षणाची संधी मिळणार आहे.
तसेच, जे विद्यार्थी श्री साईबाबा कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घेतील आणि १०वीमध्ये ९० टक्क्यांपेक्षा कमी गुण मिळवतील, त्यांच्यासाठी कोचिंग फी पैकी ५० टक्के रक्कम संस्थानतर्फे भरली जाणार आहे. यामुळे सर्वसामान्य गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांनाही उत्तम शिक्षणाची संधी उपलब्ध होईल.
याचबरोबर, अनाथ विद्यार्थी आणि एकल मातांची मुले ज्यांनी १० वी मध्ये ८० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळवले असल्यास त्यांची एमएचटी-सीईटी कोचिंग संपूर्ण फी संस्थान मार्फत भरण्यात येणार आहे.
श्री साईबाबा संस्थानचा हा उपक्रम म्हणजे ग्रामीण भागातील आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांसाठी मोठी संधी आहे. गुणवत्तापूर्ण आणि आधुनिक तंत्रज्ञानाधारित शिक्षणाच्या माध्यमातून या विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी तसेच इतर व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांमध्ये यश मिळविण्याचा मार्ग सुकर होणार आहे.
जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत आहे.