मानेच्या मणक्यातून काढलीस ७०० ग्रामची गाठ
श्री साईबाबा संस्थान संचलित श्री. साईबाबा हॉस्पिटल,शिर्डी येथे नुकतीच मानेच्या मनक्यातुन ७०० ग्रामची गाठ काढणेची यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली, डॉ.मुकुंद चौधरी न्युरो सर्जन व डॉ.संतोष सुरवसे भुलतज्ञ यांचे अथक प्रयत्नाना यश प्राप्त झाले असुन रुग्णाची तब्येत आता स्थिर आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, १७ वर्षीय तरुण रुग्ण दीपक काळे, पुणे शहरातील रहिवासी ०८ वर्षापूर्वी मानेच्या मागच्या भागात छोटीशी गाठ आली होती त्यावेळी पुण्यात सुरुवातीला तपासण्या करून मानेच्या मनक्यात गाठ असल्याचे निदान झाले त्यावेळी तेंव्हा इतर काही त्रास नसल्यामुळे अन आर्थिक परिस्थिती बेताचीच असल्यामुळे त्यावर कोणताही इलाज कुटुंबाने केला नाही. ४ वर्षात मात्र गाठी ने उग्र रूप धारण केले मानेमध्ये डाव्या बाजुला मोठा गोळा दिसु लागला व नंतर हळू हळू पेशंटचा हातपायची ताकद कमी होवुन सुमारे वर्षभरापासुन पेशंट अंथरुणाला खिळलेल्या अवस्थेत आला. मग मात्र कुटुंबीयांनी उपचाराचा निर्णय घेतला पण गेल्या ८ वर्षात साधारणतः आवळाच्या आकाराची असलेल्या या गाठीने आता एका खरबुजाचा आकार एवढी दिसत होती. इतकी मोठी व किचकट गाठ पाहुन बऱ्याच इतर हॉस्पिटलमध्ये ऑपरेशन साठी नकार दिलेला होता व ज्या ठिकाणी उपचार होवु शकतात अशा मोठया हॉस्पिटलचा खर्च परवडेनासा होता. अशा हतबल अवस्थेत कुटुंबीयांना कुठुन तरी श्री साईबाबा हॉस्पिटल, शिर्डी व तेथील न्युरोसर्जन डॉ. मुकुंद चौधरी यांचे नाव कळाले. आणि हा रुग्ण साईबाबा हॉस्पिटलच्या ओपीडी मध्ये डॉ. मुकुंद चौधरी यांना दाखविण्यासाठी दाखल झाला. तपासणी मधुन लक्षात आले की पेशंटच्या माने मधील मणक्यात मोठी गाठ असून तिने मज्जारज्जू ( Spinal Cord) वर दबाव टाकल्यामुळे रुग्णांची हातापायाची ताकद कमी झाली आहे. एमआरआय मध्ये मोठी गाठ दिसत असुन ती मानेतही बऱ्यापैकी पसरलेली होती. गाठ काढताना हातापायाची उरली सुरली ताकद जाण्याचा धोका होता. तसेच पेशंट व्हेंटिलेटर वर जाण्याचा धोका होता. अनुभवी भुलतज्ञ डॉ.संतोष सुरवसे यांचेशी चर्चा केली असता त्यांनी पेशंटला भुल देण्याची जबाबदारी स्वीकारली. दिनांक ०३/०७/२०२४ रोजी मानेतील गाठीमुळे श्वसनलिका खूप बाजूला सरकलेली असतानाही डॉ.संतोष सुरवसे यांनी ही जबाबदारी योग्य पार पाडली व पेशंट ला व्हेंटिलेटर वर घेतले. डॉ मुकुंद चौधरी यांनी दोन स्टेज मध्ये सर्जरी करत. प्रथमतः मागील बाजुने मणक्यातील गाठ मज्जारज्जू पासुन हळुवार वेगळी करत काढून घेतली. त्यानंतर उर्वरित गाठ मानेमधून काढण्यात आली. दोन्ही गाठी मिळुन त्याचे वजन जवळपास ७०० ग्राम भरले. शस्त्रक्रियेनंतर पेशंट सुखरूप असून , योग्य फिजिओथेरपीने तो हळूहळू चालायला लागेल असा विश्वास ही डॉ. मुकुंद चौधरी यांनी व्यक्त केला.
ही अवघड व मोठी गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी पार पाडल्याबद्दल डॉ.मुकुंद चौधरी, डॉ संतोष सूरवसे व त्यांचे न्युरो ओटी टीमचे सर्व सदस्य यांचे श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, तुकाराम हुळवळे, वैद्यकीय संचालक , डॉ प्रितम वडगावे यांनी अभिनंदन केले.
सर्व उपचार व ऑपरेशन महाराष्ट्र शासनाच्या महात्मा ज्योतीराव फुले या योजनेतुन मोफत करणेत आलेले आहे. त्यामुळे रुग्णांचे कुटुंबीयांनी श्री साईबाबा हॉस्पिटलचे आभार मानले.