शिर्डी
श्री साईबाबा संस्थानच्या वतीने दि.१० जून २०२४ रोजी सकाळी ११.०० वा. श्री साईनाथ रुग्णालय येथे जागतिक नेत्रदान दिन साजरा करणेत आला.
याप्रसंगी श्री साईबाबा संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांनी नेत्रदाना बाबत श्री साईबाबा संस्थान मोठ्या प्रमाणावर काम हाती घेणार असून संस्थान स्वत: च्या आयबॅंकेची उभारणी करणार असल्याचे सांगितले तसेच त्याचा मोठया प्रमाणावर नेत्रदान करणारे व अंधत्व आलेल्या व्यक्तींना फायदा होणार असून मरणोत्तर अवयवदान केल्याने मृत्यू पावलेल्या व्यक्ती या त्यांच्या दान झालेल्या अवयवाच्या रुपाने जिवंत राहतील. याकरीता मोठया प्रमाणात नेत्रदान व अवयवदानाच्या चळवळीत सहभाग नोंदवावा असे प्रतिपादन केले.
यावेळी नेत्रदाना बाबत जनजागृती व्हावी याकरीता मांडण्यात आलेल्या माहिती फलकांचे उद्धाटन मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडीलकर यांचे हस्ते करणेत आले. त्यावेळी उपस्थित असलेले उप मुख्यकार्यकारी अधिकारी तुकाराम हुलवळे यांनी या उपक्रमाला शुभेच्छा देवून मरणोत्तर नेत्रदान विषयी जनजागृती होणे गरजेचे असून यासाठी संस्थान मधील सर्व कर्मचारी यांनी प्रयत्न करावे असे अवाहन करुन अवयवदानाच्या चळवळीत संस्थान कर्मचारी व साईभक्त यांना मरणोत्तर नेत्रदाना विषयी सहजपणे माहिती व्हावी याकरीता डॉ. अशोक गावित्रे यांचेवर जबाबदारी सोपविणेत आली.
या कार्यक्रमात रुग्णालयांचे वतीने राबविणेत आलेल्या मोतिबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया या शिबीरात उत्कृष्ट काम करणारे डॉक्टर व ४५ कर्मचारी यांचा मुख्य कार्यकारी अधिकारी व उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांचे हस्ते प्रमाणपत्र देवून सन्मान करणेत आला.
हा कार्यक्रम यशस्वीरित्या पार पाडणेसाठी रुग्णालयाचे प्र.वैद्यकिय संचालक डॉ. प्रितम वडगावे, प्र.वैद्यकिय अधिक्षिका डॉ. मैथिली पितांबरे, नेत्ररोग तज्ञ डॉ. अजित पाटील, डॉ. अनघा विखे, जनसंपर्क अधिकारी सुरेश टोलमारे, सहा.अधिसेविका श्रीमती मंदा थोरात यांचेसह रुग्णायातील कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.