शिर्डी –
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने आयोजित केलेल्या श्रीरामनवमी उत्सवाच्या मुख्य दिवशी रात्रभर मंदिर दर्शनाकरीता खुले असल्यामुळे लाखो भाविकांनी श्रींच्या समाधीचे दर्शन घेतले. तर मंदिर व परिसरात करण्यात आलेल्या फुलांची आकर्षक सजावट व विद्युत रोषणाईने साईभक्तांचे लक्ष वेधुन घेतले.
आज उत्सवाच्या मुख्य दिवशी पहाटे ०५.४५ वाजता काकड आरतीनंतर अखंड पारायणाची समाप्ती झाली. श्री साईसच्चरित या पवित्र ग्रंथाची व्दारकामाईतून गुरुस्थानमार्गे मिरवणूक काढण्यात आली. संस्थानचे विश्वस्त सुरेश वाबळे यांनी वीणा, विश्वस्त सचिन गुजर व विश्वस्त महेंद्र शेळके यांनी श्रींची प्रतिमा व विश्वस्त श्रीमती अनुराधाताई आदिक यांनी पोथी घेवून मिरवणूकीत सहभाग घेतला. यावेळी संस्थानचे उपाध्यक्ष अॅड.जगदिश सावंत, विश्वस्त सर्वश्री अॅड.सुहास आहेर, अविनाश दंडवते, जयवंतराव जाधव, डॉ.एकनाथ गोंदकर, प्र.उप मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब शिंदे, संरक्षण अधिकारी आण्णासाहेब परदेशी, मंदिर विभाग प्रमुख रमेश चौधरी, मंदिर पुजारी, साईभक्त व ग्रामस्थ उपस्थित होते. संस्थानचे उपाध्यक्ष जगदिश सावंत व त्यांची सुविद्य पत्नी सौ.जान्हवीताई सावंत यांच्या हस्ते समाधी मंदिरात श्रींची पाद्यपुजा करण्यात आली. सकाळी विश्वस्त श्रीमती अनुराधाताई आदिक व सौ.शोभाताई गोंदकर यांच्या हस्ते कावडीचे पुजन करण्यात आले.
आज उत्सवाच्या मुख्य दिवशी समाधी मंदिरात व्दारकामाई मंदिरातील गव्हाच्या पोत्याची व लेंडीबागेतील श्री साईबाबा समाधी शताब्दी स्तंभाच्या ध्वजाचे पुजन संस्थानचे अध्यक्ष ना.आशुतोष काळे यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत, उपाध्यक्ष अॅड.जगदिश सावंत, विश्वस्त सर्वश्री अॅड.सुहास आहेर, अविनाश दंडवते, सचिन गुजर, रराहुल कनाल, सुरेश वाबळे, जयवंतराव जाधव, महेंद्र शेळके, डॉ.एकनाथ गोंदकर, प्र.उप मुख्य कार्यकारी अधिकारी बाबासाहेब शिंदे व मंदिर प्रमुख रमेश चौधरी आदी उपस्थित होते. सकाळी १०.०० वाजता ह.भ.प.विक्रम नांदेडकर यांचे श्रीरामजन्मावर कीर्तन झाले. कीर्तनानंतर संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांच्या हस्ते श्री रामजन्मोत्सव साजरा करण्यात आला. माध्यान्ह आरतीपुर्वी रासने कुटुंबीय व देशपांडे (निमोणकर) कुटुंबीय यांच्या वतीने नवीन निशाणांची विधीवत पूजा करुन दुपारी ०४.०० वाजता मिरवणूक काढण्यात आली. सायं. ०५.०० वाजता श्रींच्या रथाची शिर्डी गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. या रथ मिरवणूकीत साईभक्त व शिर्डी ग्रामस्थ मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. रात्रौ ०७.३० ते रात्रौ १०.०० यावेळेत विजय साखरकर, मुंबई यांचा कार्यक्रम श्री साईबाबा समाधी मंदिर शताब्दी मंडपातील स्टेजवर संपन्न झाला. तसेच आज उत्सवाचा मुख्य दिवस असल्यामुळे मंदिर रात्रभर दर्शनाकरीता खुले ठेवल्यामुळे लाखो भाविकांनी श्रींच्या समाधीच्या दर्शनाचा लाभ घेतला.
श्री रामनवमी उत्सवानिमित्त मुंबई येथुन आलेल्या मानाच्या पालख्या श्री साईसेवक व श्री साईलिला यांचे संस्थानच्या वतीने संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी भाग्यश्री बानायत यांनी स्वागत केले. तसेच श्री रामनवमी उत्सवानिमित्त उडीसा राज्यातील भुवनेश्वर येथील दानशूर साईभक्त सदाशिब दास यांच्या देणगीतून समाधी मंदिर व परिसरात करण्यात आलेल्या फुलांच्या आकर्षक सजावटीने साईभक्तांचे लक्ष वेधून घेतले. तर शिंगवे येथील ओम साई लाईटींग डेकोरेटर्स निलेश नरोडे यांच्या वतीने मंदिर व परिसरात केलेली विद्युत रोषणाई उत्सावाचे आकर्षण ठरले.
उद्या उत्सवाच्या सांगता दिवशी पहाटे ०५.०५ वा. श्रींचे मंगलस्नान व दर्शन, सकाळी ०७.०० वा. गुरुस्थान मंदिरामध्ये रुद्राभिषेक, सकाळी १०.०० वा. ह.भ.प.विक्रम नांदेडकर यांचे गोपाळकाला कीर्तन व दहीहंडीचा कार्यक्रम होणार आहे. दुपारी १२.१० वा. माध्यान्ह आरती व तीर्थप्रसाद, सायं.०६.३० वा. धुपारती होणार असून सायं.०७.३० ते रात्रौ ०९.५० यावेळेत अक्षय आयरे, मुंबई यांचा सुस्वागतम रामराज्य नृत्य-नाटिका हा कार्यक्रम होणार आहे. तर रात्रौ १०.०० वा. श्रींची शेजारती होईल.