शिर्डी -
श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था, शिर्डीच्या वतीने मंदिर प्रवेशव्दारांवर लावण्यात आलेल्या “सभ्यतापूर्ण पोषाख अथवा भारतीय संस्कृतीस अनुसरुन पोषाख परिधान करुन मंदिरात दर्शनाकरीता यावे” असे आवाहन वजा विनंती फलकांबाबत दिनांक ०३ डिसेंबर ते दिनांक ०७ डिसेंबर २०२० या कालावधीत १५ हजार ५०६ साईभक्तांनी आपल्या प्रतिसादात्मक प्रतिक्रिया नोंदविलेल्या असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी कान्हूराज बगाटे यांनी दिली.
कान्हूराज बगाटे म्हणाले, श्री साईबाबा समाधी मंदिरात दर्शनासाठी येणारे भक्त सभ्य पोषाखात नसतात अशा तक्रारी काही भक्तांनी संस्थान प्रशासनाकडे केलेल्या आहेत. या तक्रारींची दखल घेऊन संस्थान प्रशासनाकडून सभ्यतापूर्ण पोषाख परिधान करुन मंदिरात दर्शनाकरीता यावे, असे आवाहन वजा विनंती करण्यात आलेले होते. तसे फलक ही मंदिर प्रवेशव्दारांवर लावण्यात आलेले आहेत. या फलकांच्या माध्यमातून संस्थानने भाविकांना कुठलीही सक्ती केली नसून हे फक्त आवाहन करण्यात आलेले आहे. तरी या फलकाबाबत साईभक्तांचे मत जाणुन घेण्याकरीता संस्थानच्या वतीने दर्शनरांगेत अभिप्राय नोंदवही व फॉर्मची व्यवस्था करण्यात आलेली आहे.
त्यानुसार दिनांक ०३ डिसेंबर ते दिनांक ०७ डिसेंबर २०२० या कालावधीत श्रीं च्या दर्शनाकरीता आलेल्या सुमारे १५ हजार ५९९ साईभक्तांनी मंदिर प्रवेशव्दारांवर लावण्यात आलेल्या फलकांबाबत आपला अभिप्राय नोंदवीलेला आहे. यामध्ये १५ हजार ५०६ साईभक्तांनी कुठलाही आक्षेप घेतलेला नसून सदरचा निर्णय योग्यच आहे असा अभिप्राय नोंदविलेला आहे. तर ९३ साईभक्तांनी हा निर्णय अयोग्य असल्याबाबत अभिप्राय नोंदविला असल्याचे कान्हूराज बगाटे यांनी सांगितले.