श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था (शिर्डी) च्या वतीने आयोजित केलेल्या १०१ वा श्री पुण्यतिथी उत्सवाच्या मुख्य दिवशी मंदिर दर्शनासाठी रात्रभर उघडे असल्यामुळे लाखो साईभक्तांनी श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले.
आज उत्सवाच्या मुख्य दिवशी संस्थानचे अध्यक्ष डॉ.सुरेश हावेर व सौ.नलिनी हावरे, विश्वस्त भाऊसाहेब वाकचौर व सौ.सरस्वती वाकचौरे, अॅड.मोहन जयकर व सौ.स्मिता जयकर आणि विश्वस्त तथा नगराध्यक्षा श्रीमती अर्चनाताई कोते आदिंनी श्री पुण्यतिथी उत्सवात आपला सहभाग नोंदविला.
उत्सवाच्या मुख्य दिवशी पहाटे ४.३० वाजता श्रींची काकड आरती झाल्यानंतर श्री साईसच्चरित्र या पवित्र ग्रंथाच्या अखंड पारायणाची समाप्ती झाली. पारायण समाप्तीनंतर श्री साईबाबांच्या प्रतिमेची व श्री साईसच्चरित या पवित्र ग्रंथाची मिरवणूक काढण्यात आली. या मिरवणूकीत संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी पोथी, अधिक्षक पंढरीनाथ शेकडे यांनी विणा आणि अधिक्षक विठ्ठल बर्गे व अधिक्षक राजेंद्र जगताप यांनी प्रतिमा धरुन सहभाग नोंदवला. यावेळी संस्थानचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, सौ.जयश्रीताई मुगळीकर, प्रशासकीय अधिकारी आकाश किसवे, सुर्यभान गमे, कर्मचारी, ग्रामस्थ व साईभक्त मोठया संख्येने उपस्थित होते. तर सकाळी मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर व त्यांची सुविद्य पत्नी सौ.जयश्रीताई मुगळीकर यांच्या हस्ते समाधी मंदिरात पाद्यपुजा, आराधना विधी करण्यात आली.
सकाळी ९.०० वाजता शिर्डी शहरातून काढण्यात आलेल्या भिक्षा झोळी कार्यक्रमात संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर, विश्वस्त तथा नगराध्यक्षा श्रीमती अर्चनाताई कोते, उप मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे, संस्थान कर्मचारी, ग्रामस्थ व साईभक्त मोठया संख्येने सहभागी झाले होते. तसेच संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांच्या हस्ते लेंडीबागेत श्री साईबाबा समाधी शताब्दी स्तंभाच्या ध्वजाचे विधीवत पुजन करुन ध्वज बदलण्यात आला.
सकाळी १०.०० वाजता ह.भ.प.श्री.गंगाधर बुवा व्यास, डोंबिवली यांचे किर्तन झाले. दुपारी १२.३० वाजता श्रींची माध्यान्ह आरती झाली. सायंकाळी ५.०० वाजता खंडोबा मंदिर येथे सिमोल्लंघन करण्यात आले. सायंकाळी ६.१५ वाजता श्रींची धुपारती झाली. तर रात्रौ.७.०० ते १०.०० यावेळेत पंडीत सुगाटो भादुरी, कलकत्ता यांच्या क्लासिकल मंडोलिन आणि भजन कार्यक्रमास श्रोत्यांनी भरभरुन दाद दिली. रात्रौ ९.१५ वाजता श्रींच्या रथाची शिर्डी शहरातून मिरवणूक काढण्यात आली. या रथ मिरवणूकीत स्थानिक भजनी मंडळ, झांज पथक, लेझीम पथक, बॅन्ड पथक, तसेच ग्रामस्थ व साईभक्त मोठया संख्येने सहभागी झाली होते. उत्सवाच्या मुख्य दिवशी समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर उघडे असल्यामुळे नित्याची शेजारती झाली नाही. तसेच रात्रौ ११.०० ते ५.०० यावेळेत श्रींच्या समोर कलाकारांचा हजेरी कार्यक्रम झाला.
उत्सवाच्या तिस-या दिवशी बुधवार, दिनांक ०९ ऑक्टोबर रोजी सकाळी ०५.०५ वाजता श्रींचे मंगल स्नान व नंतर दर्शन, सकाळी ०६.०० वाजता श्रींची पाद्य पुजा होईल. दुपारी १२.३० वाजता माध्यान्ह आरती व तीर्थप्रसाद, सायंकाळी ०६.१५ वाजता श्रींची धुपारती, दुपारी ०४.०० वाजता ह.भ.प.श्री.गंगाधर बुवा व्यास, डोंबिवली यांचा कीर्तनाचा कार्यक्रम होईल. रात्रौ ०७.०० ते १०.०० यावेळेत पद्मश्री कुचीपुडी डान्स अकॅडमी, हैद्राबाद यांचा कुचीपुडी नृत्य कार्यक्रम होणार असून रात्रौ १०.३० वाजता शेजारती होईल.