श्री साईबाबा संस्थान विश्वस्तव्यवस्था (शिर्डी) च्या वतीने आयोजित केलेल्या १०१ व्या श्री पुण्यतिथी उत्सवाची तयारी पुर्ण झाली असून दिनांक ०७ ऑक्टोबर ते दिनांक १० ऑक्टोबर २०१९ या उत्सवकाळात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी दीपक मुगळीकर यांनी दिली.
श्री.मुगळीकर म्हणाले, जगभरात श्री साईबाबांचे लाखो साईभक्त आहेत. हे साईभक्त श्री पुण्यतिथी सोहळ्यानिमित्त आपल्या सदगुरुंचा आशिर्वाद ग्रहण करण्याकरीता शिर्डीला येतात. श्रींच्या समाधीच्या दर्शनाकरीता साईभक्तांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेवून मंदिर परिसरासह चावडी समोर, मारुती मंदिर ते शामसुंदर हॉल, साई उद्यान परिसर, मोबाईल लॉकर परिसर, जुना पिंपळवाडी रोड दर्शनरांग व फुटपाथ, साईनिवास अतिथीगृह, नविन श्री साईप्रसादालय परिसर आदि ठिकाणी ८५ हजार चौरस फुटाचे मंडप उभारण्यात आलेले आहे. तसेच अतिरिक्त निवासव्यवस्थेसाठी साईधर्मशाळा, भक्तनिवासस्थान (५०० रुम) आदी ठिाकणी ३३ हजार चौरस फुटाचे मंडप उभारण्यात आलेले आहे.
उत्सव काळात विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून उत्सवाच्या प्रथम दिवशी सोमवार दिनांक ०७ ऑक्टोबर रोजी दुपारी ४.०० वाजता ह.भ.प.श्री.गंगाधर बुवा व्यास, डोंबिवली यांचा कीर्तनाचा कार्यक्रम तर रात्रौ.७.०० ते १०.०० यावेळेत पंडीत उदय मलिक, दिल्ली व यशश्री कउलसकर, पुणे यांचा भजन संध्या कार्यक्रम होणार आहे. उत्सवाच्या मुख्य दिवशी मंगळवार दिनांक ०८ ऑक्टोबर रोजी सकाळी १०.०० वाजता ह.भ.प.श्री.गंगाधर बुवा व्यास, डोंबिवली यांचा कीर्तनाचा कार्यक्रम व रात्रौ.७.०० ते १०.०० यावेळेत पंडीत सुगाटो भादुरी, कलकत्ता यांचा क्लासिकल मंडोलिन आणि भजन कार्यक्रम होणार आहे. उत्सवाच्या तिस-या दिवशी बुधवार दिनांक ०९ ऑक्टोबर रोजी दुपारी ४.०० वाजता ह.भ.प.श्री.गंगाधर बुवा व्यास, डोंबिवली यांचा कीर्तनाचा कार्यक्रम तर रात्रौ.७.०० ते १०.०० यावेळेत पद्मश्री कुचीपुडी डान्स अकॅडमी, हैद्राबाद यांचा कुचीपुडी नृत्य कार्यक्रम होणार आहे. उत्सवाच्या सांगता दिनी गुरुवार दिनांक १० ऑक्टोबर रोजी सकाळी १०.०० वाजता ह.भ.प.श्री.गंगाधर बुवा व्यास, डोंबिवली यांचा काल्याचे कीर्तनाचा कार्यक्रम तर रात्रौ ७.०० ते १०.०० यावेळेत श्रीमती अश्विनी जोशी, नाशिक यांचा भजन संध्या कार्यक्रम होणार आहे. उत्सवकाळात कीर्तन कार्यक्रम समाधी मंदिराच्या उत्तर बाजूकडील स्टेजवर आणि निमंत्रीत कलाकारांचे कार्यक्रम श्री हनुमान मंदिराशेजारील श्री साईबाबा समाधी मंदिर शताब्दी मंडपातील स्टेजवर होणार आहे.
श्री पुण्यतिथी उत्सवानिमित्त समाधी मंदिर व मंदिर परिसरात, व्दारकामाई, चावडी व गुरुस्थान या ठिकाणी कोईमतोर येथील दानशुर साईभक्त श्री.व्ही.नागाराज यांच्या देणगीतून आकर्षक फुलांची सजावट करण्यात येणार आहे. तसेच मुंबई येथील व्दारकामाई मंडळाच्या वतीने आकर्षक विद्युत रोषणाई व प्रवेशव्दारावर भव्य देखावा उभारण्यात येत आहे. उत्सवात साईभक्तांची होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेवून साईभक्तांकरीता १५० क्विंटल साखरेचे मोतीचूर लाडू व १३० क्विंटल साखरेचे मोफत बुंदी प्रसाद पाकीटे तयार करण्यात आलेले आहे. दर्शनरांगेत व परिसरात भक्तांना चहा, कॉफी व दुध सुलभतेने मिळावे यासाठी साईआश्रम, धर्मशाळा, भक्तनिवासस्थान (५०० रुम), व्दारावती भक्तनिवासस्थान तसेच शांतीनिवास इमारतीतील दर्शनरांगेत तळमाळा व पहिल्या माळ्यावर, भक्तनिवासस्थान (५०० रुम) मंडपात, सर्व्हे नं.०१ त्रिकोणी जागेतील मंडपात आणि साईनिवास अतिथीगृहाच्या समोरील बायोमॅट्रीक काऊंटर समोरील मंडपात चहा व कॉफीची अतिरिक्त व्यवस्था करण्यात आली आहे. उत्सव काळात भक्तांच्या सोयीसाठी दर्शनरांग, मंदिर परिसर, हनुमान मंदिराशेजारील श्री साईबाबा समाधी मंदिर शताब्दी मंडपात, साईआश्रम, जुने साईप्रसादालय दर्शन रांगेजवळ व नविन श्री साईप्रसादालय आदि ठिकाणी प्रथमोपचार केंद्राची व्यवस्था करण्यात येणार असून तातडीचे सेवेसाठी मंदिर परिसरात, हनुमान मंदिराशेजारील श्री साईबाबा समाधी मंदिर शताब्दी मंडप, जुने साईप्रसादालय दर्शन रांगे जवळ व नविन श्री साईप्रसादालय येथे रुग्णवाहीका तैनात ठेवण्यात येणार आहे.
याबरोबरच दिनांक ०७ ऑक्टोबर रोजी होणा-या अखंड पारायणात भाग घेवू इच्छिणा-या साईभक्तांनी आपली नावे दिनांक ०६ ऑक्टोबर रोजी दुपारी १.०० ते ५.३० यावेळेत देणगी काऊंटर नं.०१ वर नोंदवावीत. त्यांच दिवशी सायं.५.३५ वाजता सोडत पध्दतीने भाविकांची निवड करण्यात येईल. भिक्षा झोळी कार्यक्रमात भाग घेवू इच्छितात त्यांनी आपली नावे दिनांक ०७ ऑक्टोबर रोजी सकाळी ८.०० ते ११.३० यावेळेत देणगी काऊंटर नं.०१ वर नोंदवावीत. त्यांच दिवशी त्यांच ठिकाणी दुपारी १.०० वाजता सोडत पध्दतीने भाग्यवान भक्तांची निवड करण्यात येईल. तसेच उत्सवाच्या मुख्य दिवशी ०८ ऑक्टोबर रोजी रात्रौ ११ ते ५ यावेळेत होणा-या कलाकारांच्या हजेरी कार्यक्रमासाठी इच्छुक कलाकारांनी आपली नावे समाधी मंदिराशेजारील अनाऊंसमेंट रुममध्ये मंदिर कर्मचा-याकडे आगाऊ नोंदवावीत असे ही श्री.मुगळीकर यांनी सांगितले.