श्री साईबाबा संस्थान विश्वस्त व्यवस्था, शिर्डीच्या वतीने सलग सुट्ट्यामुळे साईभक्तांची होणारी गर्दी लक्षात घेवून दिनांक २४ डिसेंबर रोजी श्री साईबाबांचे समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी रात्रभर उघडे ठेवण्यात आल्यामुळे गेल्या दोन दिवसात सुमारे ०२ लाख साईभक्तांनी श्रींच्या समाधीच्या दर्शनाचा लाभ घेतला असल्याची माहिती संस्थानच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती रुबल अग्रवाल यांनी दिली.
श्रीमती अग्रवाल म्हणाल्या, नाताळ सुट्टी व शनिवार आणि रविवार या सलग जोडून आलेल्या सुट्टयाच्या याकालावधीत शिर्डीत लाखो भाविक श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेण्यासाठी येणार असल्याची बाब लक्षात घेवून संस्थान प्रशासनाने दिनांक २४ डिसेंबर रोजी समाधी मंदिर भाविकांना दर्शनासाठी रात्रभर उघडे ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार दि. २४ व दि. २५ डिसेंबर या दोन दिवसात सुमारे ०२ लाख भाविकांनी श्री साईबाबांच्या समाधीच्या दर्शनाचा लाभ घेतला असुन दर्शनरांगेतुन सुमारे ०२ लाख साईभक्तांनी मोफत बुंदी प्रसाद पाकीटाचा लाभ घेतला. तसेच श्री साईप्रसादालयात १ लाख ४० हजार साईभक्तांनी प्रसादभोजनाचा लाभ घेतला तर प्रसाद म्हणून सुमारे १ लाख ३५ हजार लाडू प्रसाद पाकीटांचा लाभ घेतला.
चालू वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागता निमित्त होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेवून साईभक्तांना श्रींच्या दर्शनाचा लाभ सुलभ व्हावा याकरीता दिनांक ३१ डिसेंबर २०१७ रोजी समाधी मंदिर दर्शनासाठी रात्रभर उघडे ठेवण्यात येणार असून दिनांक ३१ डिसेंबर रोजी रात्रौ १०.३० वाजता होणारी शेजारती व दिनांक ०१ जानेवारी २०१८ रोजीची पहाटेची काकड आरती होणार नाही. तसेच दिनांक ०१ जानेवारी रोजी संस्थानमार्फत दैनंदिन साईभक्तांकरीता आयोजित करण्यात येत असलेल्या श्री साईसत्यव्रत पूजा, अभिषेक पूजा व वाहनांची पूजा बंद राहणार असल्याचे ही श्रीमती अग्रवाल यांनी सांगितले.